‘रिपब्लिकन ब्रदरहूड’ या नावाखाली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवणार : जोगेंद्र कवाडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 07:48 PM2021-08-17T19:48:06+5:302021-08-17T19:51:50+5:30
‘रिपब्लिकन ब्रदरहूड’ या नावाखाली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवणार : जोगेंद्र कवाडे
औरंगाबाद : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका सर्व रिपब्लिकन घटक एकत्रित करून ‘रिपब्लिकन ब्रदरहूड’ या नावाखाली लढवणार असल्याची घोषणा आज येथे पत्रपरिषदेत पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ( Jogendra Kawade) प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी केली.
त्यांनी सांगितले की, यासंदर्भात वीस पक्षसंघटनांशी बोलणी सुरू आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. नागपुरात हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात ‘रिपब्लिकन ब्रदरहूड’चा प्रयोग राबविण्यात येईल. तसेच धर्मनिरपेक्ष पक्षांकडून सन्मानजनक ऑफर आली तर आम्ही त्याचा निर्णय घेऊ. राज्यात भाजपची सत्ता असताना बौध्द व दलितांवर अत्याचार वाढले होते. महाविकास आघाडीचे तीन पक्षांचे सरकार असतानाही हे अन्याय अत्याचार वाढले असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
प्रा. कवाडे यांनी सांगितले की, महाविकास आघाडी बनवताना पीपल्स रिपब्लिकन पक्षाचाही महत्त्वाचा वाटा राहिला आहे. त्यामुळे आमच्या पक्षाला सत्तेतला पाच टक्के वाटा मिळायला पाहिजे. यासंदर्भात संबंधितांना पत्रे लिहिण्यात आली.