एक तर शहरात कुत्र्यांचा मुक्त संचार ठेवा, नाही तर नागरिकांचा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 07:43 PM2018-11-28T19:43:10+5:302018-11-28T19:46:57+5:30

शहरात एक तर मोकाट श्वानांना ठेवा किंवा सर्वसामान्य नागरिकांना, असे म्हणण्याची वेळ आली आहे.

In aurangabad, keep the free communication of dogs, not the citizens ... | एक तर शहरात कुत्र्यांचा मुक्त संचार ठेवा, नाही तर नागरिकांचा...

एक तर शहरात कुत्र्यांचा मुक्त संचार ठेवा, नाही तर नागरिकांचा...

googlenewsNext
ठळक मुद्देमोकाट श्वान : लचके नव्हे, थेट जिवावर उठले हलगर्जीपणाचा मनपाने गाठला कळस

औरंगाबाद : शहरात एक तर मोकाट श्वानांना ठेवा किंवा सर्वसामान्य नागरिकांना, असे म्हणण्याची वेळ आली आहे. मागील काही दिवसांपासून मोकाट श्वान सर्वसामान्य नागरिकांचे लचके तोडत होते. आता मात्र मोकाट श्वानांच्या टोळ्यांनी कहरच केला.

बारूदगरनाला येथील अवघ्या नऊ वर्षांचा नूर पिंजारी या चिमुकल्याला मंगळवारी चक्कजीव गमवावा लागला. या घटनेमुळे खळबळ उडाली असून, मोकाट श्वान चावल्याने मृत्यू होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी मुकुंदवाडीतील १७ वर्षीय योगेश मुनेमाने यालाही जीव गमवावा लागला होता. यानंतरही कुंभकर्णी  महापालिकेला जाग आलेली नाही.

शहरात ४५ हजारांहून अधिक मोकाट श्वान असावेत, असा महापाकिलेचा दावा आहे. वास्तविक पाहता ही संख्या जवळपास १ लाखांहून अधिक आहे. मोकाट श्वानांची संख्या दरवर्षी झपाट्याने वाढत आहे. याला फक्त आणि फक्त महापालिका प्रशासन जाबबदार आहे. श्वानांना मारण्याची परवानगी नाही. त्यांना पकडून नसबंदी करण्याचे काम मनपाकडे आहे. मागील २० वर्षांमध्ये महापालिकेने १० हजार मोकाट श्वानांची नसबंदी केलेली नाही. दरवर्षी नसबंदीचे निव्वळ ढोंग रचण्यात येते. खाजगी संस्थांना नसबंदीचे काम देऊन कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी मात्र करण्यात येते.

सहा महिन्यांपूर्वी पुण्याच्या ब्लू क्रॉस संस्थेला नसबंदीचे काम दिले आहे. एका महिन्यात २०० श्वानांचीही नसबंदी ही संस्था करीत नाही. मागील आठवड्यात फक्त ५४ श्वानांचीच नसबंदी या संस्थेने केली. एका श्वानाच्या नसबंदीपोटी महापालिका खाजगी संस्थेला तब्बल ९०० रुपये देत आहे. पाण्यासारखा पैसा खर्च करूनही मोकाट श्वानांचे प्रजनन किंचितही कमी झालेले नाही. उलट श्वानांची संख्या झपाट्याने वाढत आहे. रात्री मोकाट श्वानांच्या अक्षरश: टोळ्याच रस्त्यावर निघतात.

औरंगाबाद शहरातील मुख्य रस्त्यांवर रात्री १२ ते पहाटे ५ वाजेपर्यंत मोकाट श्वानांचेच साम्राज्य असते. या काळात पादचारी, दुचाकीस्वार सुखाने ये-जा करूच शकत नाहीत. वाहनधारकाच्या अंगावर संपूर्ण टोळीच येते. अंगावर शहारे आणणारे हे दृश्य मध्यरात्रीनंतर पाहावयास मिळते. आलिशान वाहनांमध्ये फिरणाऱ्या मनपा अधिकारी व पदाधिकाऱ्यांना सर्वसामान्यांचे दु:ख काय कळणार? मनपाच्या हलगर्जीपणामुळे आज बारूदगरनाला येथील नूर पिंजारीला आपला जीव गमवावा लागला. २००७ मध्ये मुकुंदवाडी येथील योगेश मुनेमाने या तरुणाचा मृत्यू झाला होता. 

महापौरांच्या आदेशाला केराची टोपली
दोन महिन्यांपूर्वीच शहरात मोकाट श्वानांनी हैदोस घातला होता. शालेय विद्यार्थी, मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचे श्वानांनी लचके तोडले होते. यानंतर महापौर नंदकुमार घोडेले यांनी बैठक घेऊन पुण्याच्या ब्लू क्रॉस संस्थेला दरमहा १,००० मोकाट श्वानांवर नसबंदी करा, असा आदेश दिला होता. या आदेशाची किंचितही अंमलबजावणी प्रशासन आणि खाजगी संस्थेकडून करण्यात आली नाही.

Web Title: In aurangabad, keep the free communication of dogs, not the citizens ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.