औरंगाबादच्या विधि विद्यापीठाला वाल्मीची आणखी ३३ एकर जमीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 03:55 PM2019-07-17T15:55:47+5:302019-07-17T16:03:12+5:30
जमीन विनामूल्य कब्जा हक्काने हस्तांतरित करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली.
औरंगाबाद : येथील महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठाला कांचनवाडी (जि. औरंगाबाद) येथील जल व भूमी व्यवस्थापन संस्थेची (वाल्मी) ३३ एकर जमीन विनामूल्य कब्जा हक्काने हस्तांतरित करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली.
राज्यातील युवकांना कायदेविषयक व्यावसायिक शिक्षण मिळण्यासाठी बंगळुरू येथील नॅशनल लॉ स्कूल आॅफ इंडिया युनिव्हर्सिटीच्या धर्तीवर राज्यात विधि विद्यापीठाची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार औरंगाबादच्या पदमपुरा येथील शासकीय अध्यापक महाविद्यालयात महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठाची सुरुवात २०१७ पासून तात्पुरत्या स्वरूपात करण्यात आली.
या विद्यापीठाच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या गुणवत्तापूर्ण विधि शिक्षणामुळे सामाजिक स्थैर्य, न्याय व विकासाला चालना मिळणार आहे. राष्ट्रीय विधि विद्यापीठासाठी यापूर्वी कांचनवाडी येथील १७ एकर जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आजच्या निर्णयानुसार या विद्यापीठाला उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत कांचनवाडी येथील आणखी ३३ एकर जमीन दिली जाणार आहे. त्यामुळे या विद्यापीठाच्या स्थापनेसाठी आता एकूण ५० एकर जागा उपलब्ध झाली आहे.