औरंगाबादचा लॉकडाऊन रद्द; अंमलबजावणीस अवघे २ तास उरलेले असताना नेमके काय घडले ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 12:18 PM2021-03-31T12:18:36+5:302021-03-31T12:20:44+5:30
Aurangabad lockdown canceled शासनाच्या आदेशानुसार लॉकडाऊन रद्द केल्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी जाहीर केले
औरंगाबाद : जिल्ह्यात लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू करण्यास अवघे २ तास उरलेले असतानाच पुढील आदेशापर्यंत हा लॉकडाऊन रद्द केल्याची घोषणा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी मंगळवारी रात्री १० वाजता पत्रकार परिषद घेऊन केली. राज्य शासनाच्या निर्देशानुसार लॉकडाऊन रद्द केल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी म्हणाले की, औरंगाबाद शहर आणि ग्रामीण भागातील कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत आहे. कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी ३० मार्चच्या मध्यरात्रीपासून ९ एप्रिलपर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली होती. या लॉकडाऊनचा प्रस्ताव मदत व पुनर्वसन विभागाकडे पाठविण्यात आला होता. जिल्ह्याचे पालकमंत्री, प्रधान सचिव, मुख्य सचिव यांच्याशी लॉकडाऊनवर चर्चा सुरू होती. पालकमंत्र्यांनी लॉकडाऊनसंदर्भात सूचना केल्या होत्या. लॉकडाऊनमुळे छोटे दुकानदार भरडले जातील. गरिबांचे हाल होतील, अशी शक्यता वर्तवली होती. यासोबतच लोकप्रतिनिधी आणि सामाजिक संघटना यांनीही लॉकडाऊनच्या गंभीर परिणामांविषयी प्रश्न उपस्थित केले होते. या बाबींवर प्रधान सचिव यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर आणि त्यांच्या निर्देशानुसार मंगळवारी रात्रीपासून सुरू होणारा लॉकडाऊन रद्द केला आहे. याविषयी तातडीने पत्रकारांना बोलावून माहिती देण्याच्या सूचना शासनाने दिल्या होत्या, असे त्यांनी सांगितले.
खासदारांच्या दबावामुळे प्रशासन झुकल्याची चर्चा
खासदार इम्तियाज जलील यांनी लॉकडाऊनच्या विरोधात बुधवारी पैठण गेट ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता. खासदारांनी विरोध केल्यामुळे लॉकडाऊन रद्द करीत आहात का, असा प्रश्न विचारला असता जिल्हाधिकारी म्हणाले की, लोकप्रतिनिधी आणि अनेक लोक आम्हाला भेटतात. त्यांच्या सूचना आम्ही ऐकत असतो. शासनाच्या निर्देशानुसार लॉकडाऊन रद्द करण्यात येत आहे. लॉकडाऊनसंदर्भात राज्य सरकार स्वतंत्र सर्वसमावेशक धोरण लवकरच आणणार आहे. यामुळे तूर्त लॉकडाऊन न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सामान्य जनतेचा लॉकडाऊनला विरोध असल्याचे प्रशासनाच्या लक्षात आले. शिवाय, खासदारांनी पुकारलेल्या मोर्चात गर्दी झाली तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. ही बाब लक्षात घेऊन जिल्हाधिकारी यांनी एक पाऊल मागे घेतल्याची चर्चा समाजमाध्यमावर वेगात सुरू झाली होती.
शहर आणि जिल्ह्यातील खाटांची संख्या जिल्हाधिकाऱ्यांना कळणार
एमएच मोबाइल ॲप्लिकेशन अद्ययावत केले जात असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. जिल्ह्यातील आणि शहरातील हॉस्पिटलमध्ये एकूण किती खाटा आहेत आणि किती रिकाम्या आहेत. याबाबतची माहिती या ॲप्लिकेशनवर जिल्हाधिकारी यांना दिसेल. रुग्ण भरतीची अद्ययावत माहिती प्रत्येक मिनिटाने उपलब्ध होईल.
लग्नाला ५० माणसांसह परवानगी?
आगामी काळात लग्न समारंभांना अटी व शर्तींसह परवानगी दिली जाण्याची शक्यता आहे. ५० लोकांची मर्यादा ठेवून लग्न समारंभाला परवानगी होती. तशी अथवा अन्य काही बदलांसह याचा निर्णय घेतला जाणार असल्याचे संकेत जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
रात्रीची संचारबंदी कायम
रात्री ८ ते सकाळी ७ या कालावधीत असलेली संचारबंदी ‘जैसे थे’ असल्याचे पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी यावेळी स्पष्ट केले. यामुळे नेहमीसारखे रात्री ८ वाजता दुकाने बंद करावी लागतील.