औरंगाबाद लोकसभेची निवडणूक बहुरंगी-बहुढंगी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 06:04 PM2019-03-11T18:04:50+5:302019-03-11T18:04:58+5:30
निवडणूक वार्तापत्र : संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेणाऱ्या मतदारसंघात यंदा काय घडणार ?
- स.सो. खंडाळकर
औरंगाबाद लोकसभेची निवडणूक दरवेळीच बहुरंगी-बहुढंगी राहिलेली आहे. यंदाची निवडणूकही अधिक गाजणार आहे. किंबहुना साऱ्या महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतल्याशिवाय राहणार नाही.
भाजप-सेनेची युती झाल्यामुळे विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे काही अंशी बिनधास्त वाटत आहेत. अंबादास दानवे यांच्यासारख्या पक्षांतर्गत स्पर्धकाचे आव्हान खैरेंसमोर असू शकते; पण अशी आव्हाने खैरे लीलया झेलत आले आहेत. युतीच्या उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर झाली नाही तरी खैरे यांनी आपल्या प्रचार कार्यालयाचे स्तंभपूजन करून घेतले. त्यावेळी भाजपने बहिष्काराचे अस्त्र उपसून त्यांना अपशकून करण्याचा प्रयत्न केला.‘ऐन प्रचाराच्या वेळी आम्ही सगळे जालना आणि बीडला जाऊ,’ अशी भाषा भाजपची मंडळी आतापासूनच बोलत आहे. प्रत्यक्षात काय घडते, ते बघावयाचे. खा. चंद्रकांत खैरे हे चोवीस तास राजकारणी म्हणून ओळखले जातात. त्यांची बेरीज-वजाबाकी सतत चाललेली असते.
या विरोधाचे काय?
भारत-पाकसंबंधातील ताण-तणावानंतर देशप्रेमाचे ज्वर आलेले आहे. त्यामुळे बेसिक मुद्दे गळून पडत आहेत. ते पडावेत असा प्रयत्न नक्कीच होत आहे. या देशप्रेमाच्या ज्वराचा लाभ उठवायला युती सज्ज दिसत आहे. खा. खैरे यांच्याबद्दलचे नकारात्मक वातावरणही तसे खूप आहे. वीस वर्षांत तुम्ही काय केले, असा थेट सवालच लोक आता उपस्थित करीत आहेत; परंतु औरंगाबादची प्रत्येक निवडणुका भावनिकतेवर स्वार होऊन लढल्या जातात. त्यामुळे ‘ काय केले’ वगैरे अशा प्रश्नांची फिकीर खैरेंना कालही नव्हती, आजही नाही आणि उद्याही राहणार नाही. पक्षांतर्गत विरोध व मित्रपक्ष भाजपची नाराजी यावर खैरे कसे विजय मिळवतात, हे बघणेही महत्त्वाचे ठरेल.
आघाडीचा घोळ चालूच...
दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी होण्यात यावेळेला कुठलीही खळखळ झाली नाही. शहाणपणा व समजूतदारपणा दाखवत ही आघाडी झाली; परंतु औरंगाबादची जागा कुणी लढवायची, काँग्रेस की राष्टÑवादी हा घोळ अद्याप संपला नाही. स्वत: शरद पवार बोलल्यापासून आमदार सतीश चव्हाण हे खूपच जोरात कामाला लागले आहेत. अर्थात त्यांच्याकडे मनुष्यबळ व अर्थबळ पुरेसे असल्याने त्यांनी तशी गती घेणे स्वाभाविकच. औरंगाबादला काँग्रेस सतत पराभूत झालेली आहे. त्यामुळे आता आम्हाला संधी द्या, अशी राष्ट्रवादीची भूमिका आहे; पण जिल्ह्यात राष्ट्रवादीपेक्षा कधीही आमची ताकद जास्त आहे. आमच्याकडे मनपा, जि.प. व न. प. सदस्यांची संख्या राष्ट्रवादीपेक्षा अधिक आहे.
एल्गार मोर्चाच्या माध्यमातून आम्ही जिल्हा काँग्रेसमय करून टाकला आहे, अशी बाजू काँग्रेस मांडत आहे. काँग्रेसचे आमदार सुभाष झांबड हे मागील अनेक महिन्यांपासून प्रचारात मग्न आहेत. जिल्हाभर त्यांनी संपर्क वाढवला आहे. त्यांच्याशिवायही अनेक उमेदवार काँग्रेसकडे आहेत. वेळेवर काय होते, ही जागा राष्ट्रवादीला सुटते का, न सुटल्यास काँग्रेसचा उमेदवार कोण, सुभाष झांबडच की आणखी कोण, हे सारेच प्रश्न सध्या अनुत्तरित आहेत.
कोळसे पाटील यांच्यावरून वाद...
अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार म्हणून निवृत्त न्यायमूर्ती व महाराष्ट्राचा पुरोगामी चेहरा बी. जी. कोळसे पाटील यांची उमेदवारी जाहीर करून बरेच दिवस झाले आहेत; परंतु त्यानंतर कोळसे पाटील एकदाही औरंगाबादला आले नाहीत. काँग्रेस-राष्ट्रवादीचा पाठिंबा मिळून थेट निवडणूक व्हावी, अशी भूमिका त्यांनी मांडलेली दिसते. दरम्यान, त्यांची उमेदवारी एमआयएमला रुचलेली नाही. त्यावरून एमआयएममध्ये मतैक्य नाही. उलट विरोध असून एमआयएमने स्वतंत्र निवडणूक लढवावी असा मतप्रवाह आहे. मध्यंतरी एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेण्यासाठी बैठकही घेतली. कार्यकर्त्यांच्या भावना अॅड. बाळासाहेब आंबेडकर व असदुद्दीन ओवेसी यांना कळवून त्यांचा निर्णय अंतिम मानण्याचे ठरले असल्याचे जलील यांनी जाहीर केले आहे.
नारायण राणे यांची उडी...
दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे सुभाष पाटील यांची उमेदवारी जाहीर करण्यासाठी औरंगाबादला आले होते. आम्हाला खैरेंना पाडायचे आहे, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले आहे. सुभाष पाटील हे जुने शिवसैनिक आहेत. ते खैरेंची किती मते ओढू शकतात, हे पाहणेही महत्त्वाचे ठरावे. कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव हे शिवस्वराज्य बहुजन पक्षाच्या माध्यमातून लोकसभेची तयारी करीत आहेत. आता निवडणुका जाहीर झाल्या आहेत. प्रत्यक्ष रणांगणातले चित्र काय राहील, हे हळूहळू स्पष्ट होईल व निवडणुकीची रंगत वाढेल, यात शंकाच नाही.
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ एकूण मतदार :
एकूण मतदार : १८ लाख ५९ हजार
पुरुष : ९ लाख ७९ हजार ३२१
महिला : ८ लाख ७९ हजार ६७९
नवीन मतदार : १ लाख ९६ हजार ९६३
मतदान केंद्रे : १,८५९
ईव्हीएम : अंदाजे २ हजार
कर्मचारी संख्या : १५ हजार
एकूण विधानसभा मतदारसंघ : ०६