औरंगाबाद लोकसभा निवडणूक निकाल 2019: मतमोजणीस झाली सुरुवात; मतदारराजाचा फायनल कौल कोणाला ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 08:27 AM2019-05-23T08:27:08+5:302019-05-23T08:38:09+5:30
Aurangabad Lok Sabha Election Results 2019 : कोणाच्या विजयाचा होणार जल्लोष ?
औरंगाबाद : लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीची मतमोजणी आज सकाळी (गुरुवार, २३ मे ) चिकलठाणा एमआयडीसी परिसरातील मेल्ट्रॉन कंपनी (सिपेट) येथील इमारतीमध्ये सुरु झाली आहे. शिवसेना, काँग्रेस, एमआयएम, अपक्ष या चौरंगी लढतीतून कोण बाजी मारणार, हे सायंकाळपर्यंत स्पष्ट होईल. २३ एप्रिल रोजी मतदान झाल्यानंतर निकालाची लागलेली उत्सुकता आज संपणार आहे.
औरंगाबादेत २३ पक्ष-अपक्षांचे आणि नोटा आभासी उमेदवारासह २४ उमेदवारांसाठी किती मतदान झाले याचा निकाल गुरुवारी समोर येणार आहे. शिवसेना, काँग्रेस, एमआयएम आणि अपक्ष उमेदवारामध्ये अटीतटीचा प्रचार झाला. महिनाभर निवडून कोण येणार, यावर कार्यकर्त्यांसह नागरिकांनी आकडेमोड केली. अनेकांच्या पैंजा लागल्या असून, सट्टाबाजारही तापल्याची चर्चा आहे. या सगळ्या घडामोडींना गुरुवारी विराम मिळणार असून, औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाने कोणाला खासदार म्हणून निवडले, हे गुरुवारी स्पष्ट होईल.
सकाळी ७ वाजता उमेदवार, तसेच उमेदवारांच्या प्रतिनिधींसमोर सुरक्षित कक्ष (स्ट्राँग रूम) उघडला जाईल. प्रत्यक्ष मतमोजणीला ८ वाजता सुरुवात होणार असून, प्रथम टपाली मतपत्रिकेची मोजणी होणार आहे. ८.३० वाजता सर्व ईव्हीएम मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. औरंगाबाद लोकसभेसाठी एकूण २६ फेऱ्यांमध्ये मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होणार आहे.