औरंगाबादच्या बाजारपेठेत इंदोरहून होतेय नवीन बटाट्याची आवक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 12:17 PM2018-12-24T12:17:36+5:302018-12-24T12:18:01+5:30
भाजीपाला : जुना व नवीन कांदाही बाजारात आसल्याने कवडीमोल भावात विकत आहे.
औरंगाबाद बाजारात मागील आठवड्यात इंदोरहून नवीन बटाट्याची आवक सुरू झाली आहे. जुना व नवीन कांदाही बाजारात आसल्याने कवडीमोल भावात विकत आहे.
उत्तर प्रदेशातून जुना बटाटा अगदी मातीमोल भावात मिळत असल्याने येथील आडत व्यापाऱ्यांना फक्त गाडीभाडे द्यावे लागत आहे. जुना बटाटा १५० ते ५०० रुपये प्रतिक्विंटल विक्री होत आहे. एवढे भाव कमी झाले असताना आता इंदोरहून नवीन बटाट्याची आवक सुरू झाली आहे. या बटाट्याला ७०० ते ८०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे; मात्र जुना बटाटा मोठ्या प्रमाणात शिल्लक असल्याने नवीन बटाट्याचे भाव घसरले आहेत.
जुना कांदा २०० ते ५०० रुपये, तर नवीन लाल कांदा ६०० ते ८०० रुपये प्रतिक्विंटल विक्री होत आहे. मागील आठवडाभर भाव स्थिर होते. तेजीची शक्यता नसल्याने साठवून ठेवण्यापेक्षा गरजेप्रमाणे खरेदी करणे ग्राहक पसंत करीत आहेत.