औरंगाबाद बाजारपेठेत करडी, तीळ तेल महागले; शेंगदाणा तेलाचे भाव घटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 11:52 AM2018-12-11T11:52:47+5:302018-12-11T11:53:24+5:30
बाजारगप्पा : कमी भावामुळे ग्राहक अजूनही सरकी व सोयाबीन तेल खरेदीलाच प्राधान्य देत आहेत.
- प्रशांत तेलवाडकर (औरंगाबाद)
मागील आठवड्यात करडी तेलाचे भाव लिटरमागे ५ रुपयांनी वधारले, तर शेंगदाणा तेलाचे भाव १० रुपयांनी कमी झाले. मात्र, कमी भावामुळे ग्राहक अजूनही सरकी व सोयाबीन तेल खरेदीलाच प्राधान्य देत आहेत. जसजशी थंडी वाढत आहे तसतशी तीळ व सरसो तेलासही मागणी वाढताना दिसून येत आहे.
१२ डिसेंबरपासून लग्नसराईला सुरुवात होत आहे. यंदा लग्नतिथीही जास्त आहेत व बहुतांश मंगलकार्यालयांची बुकिंग फेबुवारीपर्यंत पूर्ण झाली आहे. लग्नसराईत इतर किराणा सामानासोबत खाद्यतेलासही मोठी मागणी असते. यामुळे आता खाद्यतेल उद्योगाचे लक्ष लग्नहंगामाकडे लागले आहे. मागील आठवड्यात करडी बीचे भाव ३६०० वरून ४२०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत जाऊन पोहोचले. म्हणजेच क्विंटलमागे ६०० रुपयांनी वाढ झाली. मात्र, पेंडच्या भावात ५०० ते ६०० रुपये घटून २ हजार रुपये क्विंटलपर्यंत खाली आले. परिणामी, करडी तेलाचा भाव १ हजार रुपयांनी वधारून १५ हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत जाऊन पोहोचला आहे. किरकोळमध्ये ५ रुपयांनी महागून करडी तेल १४० ते १४५ रुपये प्रतिलिटर विकले जात आहे. करडी बीचे उत्पादन वर्षातून एकदाच होत असते. नवीन करडी येण्यास आणखी दोन महिन्यांचा कालावधी बाकी आहे. वसंत पंचमीला नवीन करडी बाजारात येईल.
दसरा-दिवाळीदरम्यान नवीन शेंगदाण्याची आवक सुरू झाली आणि शेंगदाणा तेलाचे भाव घटण्यास सुरुवात झाली. १० रुपये कमी होऊन ११० ते ११५ रुपये प्रतिलिटर विकत आहे. सध्या सरकी तेल व सोयाबीन तेल ८२ रुपये, तर ७६ रुपये प्रतिलिटर पामतेल विकले जात आहे. हिवाळ्यात पामतेल घट्ट होत असते. यामुळे पामतेलाची विक्री या काळात नगण्य होते. खाद्यतेलाचे विक्रेते जगन्नाथ बसैये बंधू यांनी सांगितले की, एकूण खाद्यतेलाच्या विक्रीपैकी ४० टक्के सोयाबीन तेल व ४० टक्के सरकी तेलाची विक्री होते. उर्वरित २० टक्क्यांमध्ये शेंगदाणा तेल व करडी तेलाची विक्री होते. यंदा तिळाचे उत्पादन घटल्याने त्याचा परिणाम तीळ तेलावरही झाला आहे. १५ लिटरच्या डब्यामागे ४५० रुपये वधारून २३०० रुपयांत तीळ तेलाचा डबा मिळत आहे. किरकोळ विक्रीत १० रुपये वाढून १६० रुपये लिटरने तीळ तेल विक्री होत आहे.
पंजाब, हरियाणा व हिमाचल प्रदेशातील नागरिक नोकरी व उद्योगाच्या निमित्ताने मागील अनेक वर्षांपासून शहरात वास्तव्यास आहेत. या नागरिकांकडून सरसो तेलाची मागणी वाढत आहे. सरसो तेल खाद्यपदार्थासाठी वापरले जातेच शिवाय हिवाळ्यात मालिशसाठीही सरसो तेलाचा वापर होतो. सध्या १२० रुपये प्रतिलिटर हे तेल विकले जात आहे. केंद्र सरकारने डिसेंबर महिन्यासाठी १९.५० लाख मेट्रिक टन साखर कोटा जाहीर केला. मागणीच्या तुलनेत साखर कोटा कमी असल्याचे साखरेच्या भावात वाढ होईल, अशी शक्यता वर्तविली जात होती. मात्र, साखर कारखानदारांनी विक्रीचा सपाटा लावल्याने भाव क्विंटलमागे ५० ते १०० रुपयांनी घटले.