औरंगाबाद बाजारपेठेत जुनी तूर डाळ मंदीत; करडी तेल तेजीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2019 12:17 PM2019-01-01T12:17:03+5:302019-01-01T12:17:29+5:30
बाजारगप्पा : आजघडीला साठेबाज व्यापाऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात जुन्या तूर डाळीचा साठा शिल्लक आहे.
- प्रशांत तेलवाडकर ( औरंगाबाद )
वर्षाच्या अखेरच्या आठवड्यात औरंगाबाद बाजारपेठेत तूर डाळीच्या भावात मंदी आली होती, तर करडी तेलात आणखी भाववाढ झाली. अन्य डाळी, धान्याचे भाव स्थिर होते.
मागील आठवडा थंडीने गाजवला. किराणा सामानाच्या तेजी-मंदीपेक्षा आज तापमान किती अंश सेल्सिअसने कमी झाले याचीच चर्चा अधिक होती. बाजारपेठेत नवीन तुरीची आवक वाढू लागताच जुन्या तूर डाळीच्या भावात मंदीला सुरुवात झाली. कारण, आजघडीला साठेबाज व्यापाऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात जुन्या तूर डाळीचा साठा शिल्लक आहे. मागील वर्षी तुरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले होते. मोठ्या प्रमाणात तूर शासनाने खरेदी केली होती. ५ ते ६ महिन्यांपूर्वी नाफेडने जुन्या तूर डाळीचे खुल्या बाजारासाठी विक्रीचे टेंडर काढले होते. यात ३७०० ते ३८०० रुपये प्रतिक्विंटलने व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात डाळ खरेदी केली होती.
यंदा खरीप हंगामात तुरीचे उत्पादन घटल्याने तूर डाळीचे भाव ८० ते १०० रुपये किलोपर्यंत जातील, अशी अपेक्षा साठेबाजांना होती; मात्र नवीन तुरीची आवक सुरू झाली असून, ४८०० ते ५००० रुपये प्रतिक्विंटल तुरीला भाव मिळत आहे. त्यात जुना साठा मोठ्या प्रमाणात असल्याने साठेबाजांनी बाजारात जुनी तूर डाळ विक्रीला आणली. ६८०० ते ७००० रुपये प्रतिक्विंटल विक्री होणाऱ्या तूर डाळीचे भाव गडगडले व शनिवारपर्यंत ५९०० ते ६४०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत खाली येऊन थांबले. क्विंटलमागे हळूहळू ६०० ते ९०० रुपयांनी भाव घसरले. साठेबाज व्यापारी येत्या काळात नवीन तूर डाळीत जुनी डाळ मिसळून ती बाजारात विक्रीला आणतील, याची शक्यता नाकारता येत नाही. यंदा तुरीचे उत्पादन कमी असल्याने आणखी मंदी येण्याची शक्यता कमी असल्याचेही व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
मागील आठवड्यात करडी तेलाचा भाव आणखी ५०० रुपयांनी वधारून १५५०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत जाऊन पोहोचला आहे. यामुळे किरकोळमध्ये ५ रुपयांनी महागून करडी तेल १४५ ते १५० रुपये प्रतिलिटर विक्री होत आहे. नवीन करडी येण्यास आणखी दोन महिन्यांचा कालावधी बाकी आहे. वसंतपंचमीला नवीन करडी बाजारात येईल, तोपर्यंत किती भाववाढ होते, हे सांगणे सध्या कठीण आहे. थंडीमुळे पामतेल घट्ट होत असल्याने मागणी घटली होती. बाकीच्या खाद्यतेलाचे भाव स्थिर होते.
केंद्र सरकारने जानेवारी महिन्यासाठी १८.५० लाख मेट्रिक टन साखर कोटा जाहीर केला आहे. शनिवारी याची घोषणा करण्यात आली. डिसेंबर महिन्यासाठी १९.५० लाख मे. टन साखर कोटा देण्यात आला होता. त्यापेक्षा नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यात १ लाख टनने कोटा कमी देण्यात आला आहे. औरंगाबाद शहराचा विचार करता दररोज २००० ते २२०० क्विंटल साखर विक्री होते. कोटा जाहीर झाला तेव्हा साखर एस (बारीक) ३१५० रुपये, सुपर एस (मध्यम) ३२०० रुपये, तर एम (जाड) ३२५० ते ३३०० रुपये प्रतिक्विंटल विक्री झाली.