औरंगाबाद मास्कची चढ्या दरानेच विक्री; सर्जिकल मास्क, एन-९५ मास्कसाठी नागरिकांच्या खिशाला कात्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2020 07:09 PM2020-10-29T19:09:33+5:302020-10-29T19:14:37+5:30
स्वस्तात मास्क मिळणे कागदावरच असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या रिअॅलिटी चेकमध्ये आढळून आले.
- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : राज्यात आता एन-९५ मास्क १९ ते ४९ रुपयांपर्यंत, तर दुपदरी आणि तीनपदरी मास्क ३ ते ४ रुपयांना मिळणार असल्याचा शासन निर्णय जाहीर करण्यात आला; परंतु शहरात अद्यापही चढ्या दरानेच मास्कची विक्री सुरू आहे. स्वस्तात मास्क मिळणे कागदावरच असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या रिअॅलिटी चेकमध्ये आढळून आले.
शासनाच्या नव्या आदेशानुसार सर्जिकल मास्क ३ ते ४ रुपयांत कुठेच उपलब्ध नाही. त्यासाठी सरळ ५ ते १० रुपये आकारले जात आहेत, तर १९ रुपये, २५ रुपये, २८ रुपये, ३७ रुपये या दरातील एन-९५ मास्कही कुठेच मिळाला नाही. शहरातील अनेक औषधी दुकानांत मास्कची विक्रीच बंद करण्यात आली आहे.
सर्जिकल ५ रुपये, एन-९५ मास्क ५० रुपये
डॉ. हेडगेवार रुग्णालय परिसरातील शिवनेरी स्वस्त औषधी दुकानावर सर्जिकल मास्कसाठी ५ रुपये आकारण्यात आले, तर एन-९५ मास्कसाठी ५० रुपये सांगण्यात आले. मास्कची किंमत कमी झाल्याविषयी विचारणा केली, तेव्हा जुना साठा आहे. त्यामुळे कमी दरात मास्कची विक्री करता येत नसल्याचे औषधी विक्रेत्याने सांगितले.
थेट १० रुपयांना सर्जिकल मास्क
रेल्वेस्टेशन रोडवरील ओम औषधी दुकानात सर्जिकल मास्कची मागणी करण्यात आली. तेव्हा एका मास्कसाठी थेट १० रुपये सांगण्यात आले. तेव्हा मास्कचे दर कमी झाले, १० रुपये कसे, अशी विचारणा केली. त्यावर स्वस्तातील मास्क आले तर दिले जातील ना, असे औषधी दुकानदाराकडून सांगण्यात आले.
एन-९५ मास्क ४० रुपये, सर्जिकल ५ रुपये
घाटी, ज्युबिली पार्क परिसरातील स्वस्त औषधी सेवा या औषधी दुकानावर एन-९५ मास्कची मागणी करण्यात आली. खरेदी केलेल्या एका मास्कसाठी ४० रुपये आकारण्यात आले, तर सर्जिकल मास्कसाठी ५ रुपये सांगण्यात आले. मास्कचे दर कमी झाल्याविषयी विचारले असता ते मुंबई, पुण्यात झाल्याचे विक्रेत्याने सांगितले.
...तर कारवाई केली जाणार
ज्या मास्कच्या किमती निश्चित केल्या आहेत, त्यानुसार त्यांची विक्री केली पाहिजे. दरापेक्षा अधिक किमतीला कोणी मास्कची विक्री करीत असेल तर कारवाई केली जाईल.
- संजय काळे, सहआयुक्त, अन्न व औषध प्रशासन