औरंगाबादच्या व्यापाऱ्याला दहा लाख रुपयांचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 12:38 AM2018-07-27T00:38:24+5:302018-07-27T00:39:20+5:30
पुणे येथील एका कंपनीत पैसे गुंतविण्यास लावून पुण्यातील तीन जणांनी औरंगाबादेतील एका जणाला तब्बल १० लाख रुपयांचा गंडा घातला. याप्र्रकरणी सिडको ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : पुणे येथील एका कंपनीत पैसे गुंतविण्यास लावून पुण्यातील तीन जणांनी औरंगाबादेतील एका जणाला तब्बल १० लाख रुपयांचा गंडा घातला. याप्र्रकरणी सिडको ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
वसीम शेख, उजेर शेख आणि लियाकत खान (सर्व रा. पुणे) अशी आरोपींची नावे आहेत. सिडको पोलिसांनी सांगितले की, आरोपींची लिमरा प्रॉपर्टीज नावाची फर्म आहे. मोतीवालानगर येथील रिजवान खान साजीद खान यांची आणि आरोपीची भेट झाली होती.
त्यावेळी त्यांच्यात एक आर्थिक व्यवहार झाला होता. हा व्यवहार आरोपींनी अत्यंत प्रामाणिकपणे केल्याने तक्रारदार यांचा त्यांनी विश्वास संपादन केला. त्यानंतर आरोपींनी तक्रारदार यांच्याकडून लिमरा फर्ममध्ये पैसे गुंतविण्यास सांगितले. विशिष्ट मुदतीत रक्कम परत करण्याची ग्वाही आरोपींनी त्यांना दिली. त्यांच्यावर विश्वास ठेवून आरोपींच्या फर्ममध्ये दहा लाख रुपये आरटीजीएसद्वारे वर्ग केले. पैसे मिळाल्यानंतर आरोपींनी तक्रारदार यांच्यासोबतचा संपर्क तोडला.
एवढेच नव्हे तर त्यांनी पैसे परत मागितल्यानंतर आरोपींनी त्यांना शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. आरोपींनी विश्वासघात केल्याचे समजताच रिजवान खान यांनी सिडको ठाण्यात बुधवारी रात्री तक्रार नोंदविली. पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सी. बी. ठुबे तपास करीत आहे.