Aurangabad Metro: ६,८०० कोटींचा ‘डीपीआर’; शहरातील दोन उड्डाणपूल पाडावे लागणार
By मुजीब देवणीकर | Published: October 31, 2022 02:34 PM2022-10-31T14:34:35+5:302022-10-31T14:35:41+5:30
जालना रोडवर वाढलेली वाहनांची वर्दळ लक्षात घेता चिकलठाणा ते वाळूजपर्यंत एकच अखंड उड्डाणपूल करावा, अशी मागणी मागील काही वर्षांपासून करण्यात येत आहे.
औरंगाबाद: चिकलठाणा ते वाळूजपर्यंत एकच अखंड उड्डाणपूल, त्यावर मेट्रो सेवा सुरू करण्यासाठी सविस्तर प्रकल्प आराखडा (डीपीआर) तयार करण्यात आला आहे. यानुसार शहरातील दोन उड्डाणपूल पाडावे लागणार असल्याची माहिती आहे. अखंड उड्डाणपुलासाठी ३ हजार ६०० कोटी, तर मेट्रो सेवेसाठी ३ हजार २०० कोटींचा असा एकत्रित ६ हजार ८०० कोटींचा ‘डीपीआर’ तयार करण्यात आला आहे. स्मार्ट सिटी कार्यालयात आज याचे सादरीकरण करण्यात आले.
जालना रोडवर वाढलेली वाहनांची वर्दळ लक्षात घेता चिकलठाणा ते वाळूजपर्यंत एकच अखंड उड्डाणपूल करावा, अशी मागणी मागील काही वर्षांपासून करण्यात येत आहे. २५ किलोमीटर अंतराच्या उड्डाणपुलासह मेट्रो रेल्वेचा उड्डाणपूल तयार करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात आला. त्यासाठी स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनने प्रकल्प आराखडा तयार करण्यासाठी महामेट्रोला ‘डीपीआर’ करण्याचे काम सोपविले. महामेट्रोने शहराचा गतिशीलता आराखडा तयार केला आहे. त्यासोबतच मेट्रोचा ‘डीपीआर’देखील तयार करण्यात आला. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, मनपा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्यासमोर स्मार्ट सिटी कार्यालयात आज सादरीकरण करण्यात आले. यानुसार शहरातील मोंढानाका, सेव्हनहिल उड्डाणपूल मेट्रोमुळे पाडावे लागणार आहेत. क्रांती चौक आणि सिडको येथील उड्डाणपूल कामात येतील अशी माहिती आहे.
तीन वर्ष लागतील कामाला
चिकलठाणा ते वाळूजपर्यंत अखंड उड्डाणपूल तयार केला जाणार आहे. हा पूल दुमजली (डबलडेकर) असेल. त्यावरून वाहतूक आणि मेट्रोदेखील धावणार आहे. या कामाची परवानगी २०२३ मध्ये मिळाली तर पुढील तीन वर्षात काम पूर्ण होईल. नोव्हेंबर अखेरपर्यंत ‘डीपीआर’ सादर केला जाणार आहे. ‘डीपीआर’ तयार करताना शहर विकास आराखड्यात मेट्रोसाठी लागणारी जमीन संपादित करावी लागेल. त्यासोबतच संरक्षण विभागाकडून छावणीमधून मेट्रोचा पूल उभारण्याकरिता ना हरकत परवानगी घ्यावी लागेल. त्यामुळे मेट्रोचा ‘डीपीआर’ तयार झाल्यानंतरही या अडचणी प्रामुख्याने सोडवाव्या लागणार आहेत.
अखंड उड्डाणपूल
अखंड उड्डाणपूल उभारण्यासाठी महामेट्रोने ३ हजार ६०० कोटी रुपयांचा ‘डीपीआर’ तयार केला आहे. त्यासोबतच मेट्रो रेल्वेसाठी ३ हजार २०० कोटी रुपयांचा उड्डाणपूल बांधण्यासाठीचा ‘डीपीआर’ बनविण्यात आला आहे. दोन्ही उड्डाणपूल मिळून ६ हजार ८०० कोटी रुपयांचा ‘डीपीआर’ तयार केला आहे.