दूध संघाच्या बिनविरोध निवडणुकीचे प्रयत्न अखेर असफल !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2022 12:39 PM2022-01-12T12:39:50+5:302022-01-12T12:42:52+5:30
अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवसअखेर सात उमेदवार बिनविरोध निवडून आले. तर आता सात जागांसाठी मतदान होणार आहे.
- स. सो. खंडाळकर
औरंगाबाद : जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी रात्री १० वाजेपर्यंत प्रयत्न चालू होते. यावर काही जणांनी जोरदार आक्षेप घेतला. रात्री उशिरापर्यंत केलेले प्रयत्न अखेर असफल ठरल्याने ज्यांना निवडणूक हवी होती, ते खूश झाले आहेत.अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवसअखेर सात उमेदवार बिनविरोध निवडून आले. तर आता सात जागांसाठी मतदान होणार आहे. दूध संघाचे विद्यमान उपाध्यक्ष नंदलाल काळे बिनविरोध निवडून आले. तर अध्यक्ष आ. हरिभाऊ बागडे निवडणूक रिंगणात आहेत.
दूध संघाच्या १४ संचालक पदांसाठी ही निवडणूक होत आहे. एकूण ३४६ मतदार आहेत. अर्ज छाननीत ७४ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. गेल्या निवडणुकीप्रमाणे यंदाही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी प्रयत्न झाले. त्यासाठी सर्व पक्षीय उमेदवार देण्याची तयारीही करण्यात आली होती. यात शिवसेना, भाजपला प्रत्येकी सहा तर काँग्रेसला दोन जागा देण्याचे धोरण ठरविण्यात आले होते, अशी माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने व निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी पडद्याआड घडामोडी जोमात झाल्या. मंत्रीद्वय संदीपान भुमरे व अब्दुल सत्तार, आ. हरिभाऊ बागडे, आ. अंबादास दानवे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते दूध संघात सायंकाळी उशिरापर्यंत ठाण मांडून बसले होते. त्यांच्या प्रयत्नांना अर्धे यश प्राप्त झाले आणि विविध गटांतून अन्य उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने १४ पैकी ७ जागा बिनविरोध निवडून आल्या.
सात जागांसाठी होणार मतदान :
सर्वसाधारण मतदारसंघापैकी वैजापूर, फुलंब्री, कन्नड व औरंगाबाद या चार तर महिला राखीव २ आणि विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील १ अशा एकूण सात जागांसाठी मतदान होणार आहे. बुधवारी अंतिम उमेदवारांची यादी जाहीर करून चिन्हवाटप होणार आहे.