औरंगाबाद : एमआयएम नगरसेवकाला नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2018 12:01 AM2018-01-14T00:01:05+5:302018-01-14T00:01:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : एमआयएम पक्षाच्या आठ नगरसेवकांवर अगोदरच अपात्रतेची टांगती तलवार असताना शुक्रवारी मनपा आयुक्त डी. एम. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : एमआयएम पक्षाच्या आठ नगरसेवकांवर अगोदरच अपात्रतेची टांगती तलवार असताना शुक्रवारी मनपा आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी आणखी एका नगरसेवकाला अपात्रतेची नोटीस बजावल्याने पालिकेत एकच खळबळ उडाली आहे. एकाच पक्षाच्या नऊ नगरसेवकांवर अपात्रतेच्या कारवाईला सामोरे जाण्याची ही इतिहासातील पहिलीच घटना होय.
औरंगपुरा भाजीमंडईच्या पाठीमागे सीटीएस नं. ३३९८/बी, ३३९८/२, ही जागा उद्यानासाठी आरक्षित करण्यात आली. मूळ जमीन मालक जीवन जहागीरदार यांच्याकडून मनपाने भूसंपादनही करून घेतले. या जागेवर मनपाने ताबा घेतला नाही. नागरिकांनी मोकळी जागा बघून अतिक्रमण करून टाकले. ज्या उद्देशासाठी महापालिकेने जागा घेतली तो उद्देश सफल होत नसल्याची तक्रार जहागीरदार यांनी खंडपीठात केली.
याचिकेमुळे (क्र. ११४३४ /२०१४) मनपा संकटात सापडली. उद्यानाच्या जागेचा ताबा घेण्याची प्रक्रिया मनपाच्या अतिक्रमण हटाव पथकाने सुरू केली. जागेवर काही कच्चे व दोन मोठ्या इमारती आहेत. एक छोटेसे धार्मिकस्थळही बांधण्यात आले. बुधवार ११ जानेवारी रोजी घटनास्थळावर मनपाचे अतिक्रमण हटाव पथक गेल्यावर एमआयएम नगरसेवक विकास एडके यांनी कडाडून विरोध दर्शविला.
शिष्टमंडळासह नंतर ते मनपा आयुक्तांकडे केले. आयुक्तांनी हे प्रकरण खूप गंभीर आहे. न्यायालयात अवमान याचिका दाखल असल्याचे त्यांना सांगितले. धार्मिकस्थळ वाचविण्यासाठी एमआयएमच्या २५ नगरसेवकांचे पद गेले तरी चालेल, अशी भाषा एडके यांनी केली
होती.
शुक्रवारी महापालिकेने उद्यानाच्या जागेवरील नऊ अतिक्रमणे काढली. आणखी काही अतिक्रमणे बाकी आहेत. या प्रकरणात एडके यांनी कारवाईत अडसर आणला म्हणून मनपा आयुक्त मुगळीकर यांनी त्यांना अपात्रतेसंदर्भात नोटीस दिली. नोटीसचे उत्तर आल्यानंतर पुढील कारवाई होईल, असेही आयुक्तांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
एमआयएमवर संकट गडद
मनपा सर्वसाधारण सभेत गोंधळ घातल्याप्रकरणी एमआयएमचे सय्यद मतीन, शेख जफर, अब्दुल अजीम यांच्या अपात्रतेचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. दमडी महल येथील अतिक्रमण हटाव मोहिमेत हस्तक्षेप केल्याप्रकरणी विरोधी पक्षनेते फेरोज खान, गटनेते नासेर सिद्दीकी, नगरसेवक जमीर कादरी, सरवत बेगम, सईदा फारुकी यांचे नगरसेवकपद रद्द करावे असा ठराव सर्वसाधारण सभेने घेतला आहे. कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहल यांना मारहाण केल्याच्या आरोपावरून फेरोज खान यांच्या अपात्रतेचा प्रस्ताव शासनाकडे पडून आहे.