औरंगाबादमध्ये समाजकंटकांनी मध्यरात्री कारच्या काचा फोडल्या;आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2018 01:35 PM2018-09-08T13:35:37+5:302018-09-08T13:36:54+5:30
पुंडलिकनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील एका औषधीदुकानासमोर उभी करून ठेवलेल्या कारच्या काचा अज्ञात समाजकंटकांनी फोडल्या.
औरंगाबाद: पुंडलिकनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील एका औषधीदुकानासमोर उभी करून ठेवलेल्या कारच्या काचा अज्ञात समाजकंटकांनी फोडल्या. शुक्रवारी रात्री २ वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी पुंडलिकनगर ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली.
गाडीमालक प्रसाद अशोकचंद कुकुंलोळ(जैन)यांनी सांगितले की, शुक्रवारी रात्री ते मित्रांसह भद्रा मारोती दर्शन घेऊन आले. रात्री दोन वाजेच्या सुमारास त्यांनी घराजवळील औषधीदुकानासमोर त्यांची कार (क्रमांक एमएच-२०डीजे ७७७१)उभी करून घरी गेले. त्यानंतर समाजकंटकांनी त्यांच्या कारच्या मागील आणि समोरच्या काचेवर लोखंडी टॉमीसारख्या वस्तूने हल्ला केला. यावेळी काचांचा चक्काचुर झाला. काचा फोडण्याच्या आवाजाने शेजारील नागरीक झोपेतून उठले. तोपर्यंत आरोपी तेथून पसार झाले. या घटनेची माहिती त्यांनी प्रसाद यांना दिली. त्यानंतर त्यांनी कारकडे येऊन पाहिले असता कारच्या काचा फोडण्यात आल्याचे त्यांना दिसले. याघटनेची माहिती त्यांना पुंडलिकनगर ठाण्याला दिली. याप्रकरणी रात्री त्यांनी अज्ञात समाजकंटकाविरोधात फिर्याद नोंदविली. पोहेकाँ वैष्णव तपास करीत आहे.
समाजकंटक सीसीटिव्हीत कैद
घटनास्थळाशेजारील एका मोबाईल शॉपीवर लावण्यात आलेल्या सीसीटिव्हीमध्ये समाजकंटक कैद झाला. तोंडाला रूमाल बांधून त्याने हे कृत्य केले. त्यानंतर एक जण अंधारात पुंडलिकनगरच्या गल्ली नंबर २मध्ये पळून जात असल्याचे दिसले. त्या सीसीटिव्हीच्या आधारे पोलीस संशयिताचा शोध घेत आहेत.