Raj Thackeray: माझा पाय मोडला अन् त्यानंतर...; स्वागत न स्वीकारण्यामागं राज ठाकरेंनी सांगितलं कार्यकर्त्यांना कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2021 09:29 AM2021-12-14T09:29:09+5:302021-12-14T09:29:33+5:30
संध्याकाळी साडे सातच्या सुमारास मनसे अध्यक्ष राज ठाकरे बाबा पेट्रोल पंप चौकात दाखल झाले. त्याठिकाणी ढोलताशे, मोटारसायकल रॅली आणि फुलांचे हार असं जंगी कार्यक्रम पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून होणार होता.
औरंगाबाद – मनसे अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thackeray) हे महाराष्ट्र दौऱ्यावर असून सध्या ते औरंगाबादमध्ये २ दिवसीय कार्यक्रमात आहेत. याठिकाणी राज ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार असून विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या भेटीगाठी घेणार आहेत. सोमवारी रात्री राज ठाकरेंचे शहरात आगमन झालं. राज ठाकरे शहरात येणार असल्यानं त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली. बाबा चौकात कार्यकर्ते जमले होते. परंतु राज ठाकरे यांनी स्वागत न स्वीकारता थेट शासकीय विश्रामगृह गाठलं. त्यामुळे कार्यकर्त्यांना हिरमोड झाला. परंतु त्यानंतर राज ठाकरेंनी असं का केले याचं कारणही सांगितले.
संध्याकाळी साडे सातच्या सुमारास मनसे अध्यक्ष राज ठाकरे बाबा पेट्रोल पंप चौकात दाखल झाले. त्याठिकाणी ढोलताशे, मोटारसायकल रॅली आणि फुलांचे हार असं जंगी कार्यक्रम पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून होणार होता. पण त्यावेळी भलतेच घडले. राज ठाकरे बाबा पेट्रोप पंप चौकात न थांबता थेट शासकीय विश्रामगृहात निघून गेले. त्यानंतर कार्यकर्त्यांना माझा पाय मोडला त्यानंतर हात मोडला एक एक करत विघ्नं येत गेले म्हणून स्वागत स्वीकारु शकलो नाही असं कारण राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना सांगितले.
कसा आहे राज ठाकरेंचा औरंगाबाद दौरा?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे दिवसभर औरंगाबादमध्ये असून सकाळी १० वाजता मराठवाड्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. त्यानंतर दुपारी २ च्या सुमारास ते पत्रकार परिषद घेतील. संध्याकाळी ५ वाजता एका खासगी कार्यक्रमाला हजेरी लावून ते पुण्यासाठी रवाना होतील.
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेचे 'राजदूत' उतरणार
राज ठाकरे यांच्या पक्षाची मागील काही वर्षातील परिस्थिती पाहिली तर नक्कीच ती समाधानकारक नाही. पक्षाला सातत्याने पराभवाचा सामना करावा लागल्यामुळे पक्ष सोडून जाणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. यामुळे पक्षात पुन्हा ताकद निर्माण करण्यासाठी राज ठाकरे यांनी नवी योजना आखली आहे. यानुसार मनसे 'राजदूत' नेमणार आहे. आगामी निवडणुकांत पक्षाची ध्येय धोरणे आणि पदाधिकाऱ्यांनी केलेली कामे हे 'राजदूत' घरोघरी पोहचवणार आहेत.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या पक्षाची गेल्या अनेक वर्षापासून स्थिती ढासळत चालल्याची चर्चा आहे. राज ठाकरे कार्यकर्त्यांना भेटतचं नाहीत अशीही चर्चा मागील काही वर्षात सातत्याने राजकीय वर्तुळात रंगत आहे. परंतु, राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र दौऱ्याच्या निमित्ताने कदाचित या सर्व चर्चांना पूर्ण विराम बसण्याची शक्यता आहे. कारण, या सर्वच प्रकारांना आळा घालण्यासाठी राज ठाकरे यांनी आता एक नवा प्लॅन तयार केल्याची माहिती मिळत आहे.