औरंगाबाद : पुतळ्याची विटंबना करणारे मोकाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2018 11:55 PM2018-03-11T23:55:24+5:302018-03-11T23:55:31+5:30
समर्थनगरातील वि.दा. सावरकर पुतळ्याचे विद्रुपीकरण करण्याची घटना उघडकीस येऊन ३६ तास उलटल्यानंतरही पोलिसांना समाजकंटकांना पकडता आले नाही. महानगरपालिकेने मात्र तेथे एक सीसीटीव्ही कॅमेरा रविवारी बसवून सेफ सिटी प्रकल्पाच्या अन्य कॅमेºयांशी संलग्न केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : समर्थनगरातील वि.दा. सावरकर पुतळ्याचे विद्रुपीकरण करण्याची घटना उघडकीस येऊन ३६ तास उलटल्यानंतरही पोलिसांना समाजकंटकांना पकडता आले नाही. महानगरपालिकेने मात्र तेथे एक सीसीटीव्ही कॅमेरा रविवारी बसवून सेफ सिटी प्रकल्पाच्या अन्य कॅमेºयांशी संलग्न केला.
सावरकरांच्या पुतळ्याची अज्ञात समाजकंटकाने शनिवारी पहाटे विटंबना केली होती. याप्रकरणी क्रांतीचौक पोलीस ठाण्यात समाजकंटकांविरोधात मनपाने गुन्हा नोंदविला. घटना समोर आल्यानंतर हजारो सावरकरप्रेमींनी रास्ता रोको करून आरोपींना पकडण्याची मागणी केली. या घटनेनंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. घटनास्थळावरील सेफ सिटीचे सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याने पोलिसांना त्या कॅमेºयांचा कोणताही लाभ झाला नाही. असे असले तरी परिसरातील विविध दुकानदारांनी रस्त्यावर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेºयांचे फुटेजची तपासणी पोलीस करीत आहेत.
सावरकर चौकात मनपाने बसविला सीसीटीव्ही कॅमेरा
पुतळे हे महानगरपालिकेची मालमत्ता असल्याने या पुतळ्यांचे संरक्षण करण्याची जबाबदारीही मनपाची आहे. शनिवारच्या घटनेनंतर खडबडून जागे झालेल्या मनपाने आज रविवारी दुपारी सावरकर यांच्या पुतळ्याच्या सुरक्षेसाठी तेथे एक सीसीटीव्ही कॅमेरा बसविला. हा कॅमेरा पोलिसांच्या सेफ सिटी कॅमेºयांच्या लाईनसोबत संलग्न करण्यात आला. मात्र, शहरातील अन्य पुतळ्यांच्या सुरक्षेसाठी मनपा तेथे कधी कॅमेरे बसविणार, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.