औरंगाबादचे मॉडेल रेल्वेस्टेशन समस्यांच्या विळख्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 12:23 AM2018-04-23T00:23:10+5:302018-04-23T00:24:45+5:30
औरंगाबादचे ‘ए’ श्रेणीतील मॉडेल रेल्वेस्टेशन ए-१ श्रेणीच्या उंबरठ्यावर उभे आहे. प्रवासी वाहतुकीच्या माध्यमातून रेल्वेस्टेशनवर वर्षाला सुमारे ५५ कोटींचे उत्पन्न मिळते. परंतु आजघडीला मॉडेल रेल्वेस्टेशन आणि परिसर समस्यांच्या विळख्यात सापडले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : औरंगाबादचे ‘ए’ श्रेणीतील मॉडेल रेल्वेस्टेशन ए-१ श्रेणीच्या उंबरठ्यावर उभे आहे. प्रवासी वाहतुकीच्या माध्यमातून रेल्वेस्टेशनवर वर्षाला सुमारे ५५ कोटींचे उत्पन्न मिळते. परंतु आजघडीला मॉडेल रेल्वेस्टेशन आणि परिसर समस्यांच्या विळख्यात सापडले आहे. जागोजागी अस्वच्छता, खड्डे, तुटलेले बॅरिकेटस्, ठिकठिकाणी वाळण्यासाठी टाकलेल्या कपड्यांनी रेल्वेस्टेशन परिसर बकाल होत आहे.
ए-१ श्रेणीत समावेश होण्यासाठी ६० कोटींवर उत्पन्न आवश्यक असल्याने अवघ्या ५ ते ६ कोटींनी उत्पन्न वाढीची गरज आहे. या श्रेणीत समावेश झाल्यास अधिक गतीने रेल्वेस्टेशनचा विकास होण्याचा मार्ग मोकळा होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. परंतु ५५ कोटींचे उत्पन्न देणाऱ्या रेल्वेस्टेशनवर सोयी-सुविधांत सुधारणा आणि वाढ करण्याची गरज आहे. परंतु त्याकडे दुर्लक्ष होत आहे. परिणामी प्रवाशांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
पर्यटनाची राजधानी असलेल्या औरंगाबादेत दररोज हजारो प्रवासी, पर्यटक ये-जा करतात. परंतु रेल्वेस्टेशनची अवस्था पाहून नाराजी व्यक्त करण्याची वेळ येत आहे. रेल्वेस्टेशनच्या प्रवेशद्वारासमोरील कमानीवरील फलकाची दुरवस्था झालेली आहे. या कमानीसमोरील रस्त्यावरील खड्डे आणि दगडांनीच प्रवाशांचे स्वागत होते. रेल्वेस्टेशनच्या जुन्या इमारतीसमोर कपडे वाळत घातले आहेत. हा प्रकार पाहून हे रेल्वेस्टेशन आहे की, धोबीघाट, असा प्रश्न क्षणभर ये-जा करणाºया प्रवाशांना पडतो. ठिकठिकाणी उघड्यावरच लघुशंका केली जाते. जुन्या इमारतीसमोरील ड्रेनेजच्या चेंबरची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतो. नव्या इमारतीसमोरील पोलीस चौकी बेवारस अवस्थेत असून अनेक जण अनधिकृत ताबा घेत आहेत. या चौकीचा आराम करण्यासाठी अनेकांकडून वापर केला जात आहे. रेल्वेस्टेशनवरील ही परिस्थिती दूर करण्याची मागणी प्रवासी आणि प्रवासी संघटनांकडून होत आहे.
मेटल डिटेक्टर बंद
रेल्वेस्टेशनच्या नव्या इमारतीमध्ये प्रवेश करताना सुरक्षेच्या दृष्टीने मेटल डिटेक्टर लावण्यात आले. परंतु आजघडीला ते बंदच असून, ते केवळ शोभेची वस्तू ठरत आहे. याठिकाणी लावलेले लोखंडी बॅरिकेटस्ही काढण्यात आले. बॅरिकेटस्अभावी रेल्वेस्टेशनमध्ये ये-जा करणारे प्रवासी मेटल डिटेक्टरच्या बाजूने ये-जा करतात. त्यामुळे रेल्वेस्टेशनची सुरक्षा धोक्यात येत आहे.