औरंगाबाद मनपाचा लेखा विभाग अडचणीत; राज्य शासनाच्या निधीची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2018 03:45 PM2018-02-08T15:45:44+5:302018-02-08T15:48:09+5:30
जीएसटीपोटी राज्य शासनाकडून दर महिन्याला येणारे २० कोटी रुपये अद्याप प्राप्त झाले नाहीत. फेब्रुवारी महिन्याचा पहिला आठवडा उलटला तरी पगारासाठी पैसे नाहीत. निवृत्त कर्मचारी पेन्शनसाठी लेखा विभागाचे उंबरठे झिजवत आहेत.
औरंगाबाद : जीएसटीपोटी राज्य शासनाकडून दर महिन्याला येणारे २० कोटी रुपये अद्याप प्राप्त झाले नाहीत. फेब्रुवारी महिन्याचा पहिला आठवडा उलटला तरी पगारासाठी पैसे नाहीत. निवृत्त कर्मचारी पेन्शनसाठी लेखा विभागाचे उंबरठे झिजवत आहेत. अशा अनेक संकटात महापालिकेचा लेखा विभाग घेरल्या गेला असतानाच मुख्य लेखाधिकारी राम सोळुंके दीड महिन्याच्या दीर्घ सुट्टीवर निघून गेले. त्यांचा अतिरिक्त कार्यभार आता उपमुख्य लेखापरीक्षक महावीर पाटणी यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
फेब्रुवारी महिन्यातही मालमत्ता कर, पाणीपट्टीच्या वसुलीत फार काही सुधारणा झालेली नाही. नगररचना विभागात अधिकारी नसल्याने तेथूनही महसूल येणे बंद झाले आहे. जानेवारी महिन्याचा पगार करण्यासाठी तिजोरीत १५ कोटी रुपये नाहीत. तिजोरीतील जेमतेम रकमेवर निवृत्त कर्मचार्यांचे पेन्शन देता येईल. यावरही ३ कोटी रुपये खर्च येतो. पेन्शन वाटपापूर्वीच मुख्य लेखाधिकारी सोळुंके सुट्टीवर गेले. त्यांचा अतिरिक्त कार्यभार मुख्य लेखापरीक्षक दीपाराणी देवतराज यांनी स्वीकारण्यास नकार दिला. लेखाधिकारी संजय पवार यांना पदभार देण्याची प्रशासनाची मानसिकता नाही. कार्यभार कोणाला द्यावा या चिंतेत प्रशासन होते. बुधवारी सायंकाळी वॉर्ड अधिकारी म्हणून काम पाहणारे उपमुख्य लेखापरीक्षक महावीर पाटणी यांच्याकडे मुख्य लेखाधिकारीपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला.