कचरा प्रश्न भोवला?औरंगाबाद मनपा आयुक्त दीपक मुगळीकर यांची बदली
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2018 01:08 PM2018-03-16T13:08:26+5:302018-03-16T13:17:07+5:30
औरंगाबाद मनपा आयुक्त डी.एम .मुगळीकर यांची बदली करण्यात आली आहे.
औरंगाबाद - औरंगाबाद मनपा आयुक्त डी.एम .मुगळीकर यांची बदली करण्यात आली आहे. यावरुन औरंगाबादमध्ये पेटलेला कचरा प्रश्न भोवल्याचं म्हटले जात आहे. जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्याकडे पालिकेचा अतिरिक्त पदभार सोपावण्यात आले आहे. तर दीपक मुगळीकर यांची वैधानिक विकास महामंडळात बदली करण्यात आली आहे.
गेल्या 28 दिवसांपासून शहरातील रस्त्यांवर कच-याचे ढीग साचले आहेत. यावर महापालिकेच्या पदाधिकारी आणि आयुक्तांना तोडगा काढता आलेला नाही. 7 मार्च रोजी मिटमिट्यामध्ये महापालिका आयुक्त दीपक मुगळीकर यांच्या आदेशाने कच-याची वाहने निघाली. यास नागरिकांनी विरोध केला. पोलीस आणि नागरिकांमध्ये दगडफेकीच्या घटना होऊन संघर्ष निर्माण झाला. यामध्ये पोलिसांनी नागरिकांनाच बदडून काढले.
नारेगाव येथील डेपोत कचरा टाकण्यासाठी परिसरातील नागरिकांना महापालिकेला चार महिन्यांची मुदत दिली होती. या मुदतीत महापालिकेचे आयुक्त, प्रशासन आणि पदाधिका-यांनी कोणताही तोडगा काढला नाही. कच-याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, याचे गांभीर्य महापालिकेला नव्हते. चार महिन्यांची मुदत संपताच नारेगावकरांनी आंदोलनाचे हत्यार उपसले.कच-याची समस्या सोडविण्यासाठी राज्य सरकारने नगरविकास विभागाच्या मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांना धाडले. त्यांनी पंचसूत्री जाहीर केली. मात्र, या पंचसूत्रीचीही अंमलबजावणी झालेली दिसत नाही. यामुळे कच-याच्या प्रश्नाआधी आणि नंतरही महापालिका गंभीर नसल्याचे दिसले. कचरा प्रश्न निर्माण करून हजारो नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचा संताप व्यक्त करण्यात येत आहे.
औरंगाबादमध्ये पुन्हा येण्याची इच्छा नाही, सक्तीच्या रजेवर पाठवलेले नाराज पोलीस आयुक्तांचे स्पष्टीकरण
औरंगाबादमधील कचराकोंडीवेळी मिटमिटा येथे झालेल्या गोंधळामुळं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस आयुक्त यशस्वी यादव सक्तीच्या रजेवर पाठवले. त्यांनंतर प्रतिक्रिया देताना पोलीस आयुक्त यशस्वी यादव म्हणाले की, औरंगाबादमध्ये अनेक चांगली कामं करायची इच्छा होती. पण सक्तीच्या रजेवर पाठवायच्या सरकारच्या निर्णयामुळे ही कामे आता नवीन अधिकारी पूर्ण करतील. असा आशावाद व्यक्त करत पुन्हा औरंगाबादमध्ये येण्याची इच्छा नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच औरंगाबाद शहराचा कचरा प्रश्न लवकरात लवकर सुटावा, अशी इच्छाही व्यक्त केली.
आपल्या 325 दिवसांच्या कार्यकाळात गुन्ह्यामध्ये मोठ्याप्रमाणात घट झाली असल्याचा दावा करताना ते म्हणाले, शहरात 400 पेक्षा जास्त सीसीटीव्ही बसवले आहेत. त्यातून अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. पोलिसांना या घटनांचा छडा लावण्यात यश आले. 125 कोटी रूपयांचा निधी शहरात सीसीटीव्हीसाठी आलेला आहे. ते काम पूर्ण करायच होते. आता नवीन अधिकारी त्या कामाला गती देतील असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
काय आहे प्रकरण -
औरंगाबादमध्ये आठ तारखेला मिटमिटा गावात पोलीस आणि गावकऱ्यांमध्ये तणाव निर्माण झाला. त्यात गावकऱ्यांनी पोलिसांवर दगडफेक केली. त्याला प्रत्तुतर देण्यासाठी पोलिसांनीही काही घरांवर दगडफेक केली. पोलिसांनी केलेल्या दगडफेकीचे सीसीटीव्ही फुटेज माध्यमांनी सार्वजनिक करून घटनेचं वास्तव जगासमोर आणलं.