औरंगाबाद महापालिका : सर्वसाधारण सभेकडून अर्थसंकल्पात ३८८ कोटींची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 12:16 AM2018-06-12T00:16:41+5:302018-06-12T00:21:25+5:30

महापालिकेने यंदा अर्थसंकल्पात मूळ उत्पन्नाच्या तीनपट उड्डाण घेतली आहे. अवघ्या ७०० कोटींचे उत्पन्न असताना महापालिकेच्या सर्वोच्च सभागृहाने सोमवारी तब्बल १८६४ कोटी ८० लाख रुपयांच्या अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली.

 Aurangabad Municipal Corporation: The general body budget increased by 388 crores | औरंगाबाद महापालिका : सर्वसाधारण सभेकडून अर्थसंकल्पात ३८८ कोटींची वाढ

औरंगाबाद महापालिका : सर्वसाधारण सभेकडून अर्थसंकल्पात ३८८ कोटींची वाढ

googlenewsNext
ठळक मुद्दे१८६४ कोटींची भरारी

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : महापालिकेने यंदा अर्थसंकल्पात मूळ उत्पन्नाच्या तीनपट उड्डाण घेतली आहे. अवघ्या ७०० कोटींचे उत्पन्न असताना महापालिकेच्या सर्वोच्च सभागृहाने सोमवारी तब्बल १८६४ कोटी ८० लाख रुपयांच्या अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली. महापालिकेच्या इतिहासात प्रथमच अर्थसंकल्प दोन हजार कोटींपर्यंत पोहोचला आहे.
या अर्थसंकल्पामुळे पुढील दोन वर्षे महापालिकेला अर्थसंकल्पाची गरजच पडणार नाही. मागील वर्षीचे स्पील ओव्हर आणि यंदाची विकासकामे करण्यातच नगरसेवकांचा कार्यकाळ संपणार आहे. सोमवारी सकाळी ११.४५ वा. सर्वसाधारण सभेला सुरुवात करण्यात आली. प्रारंभी एक तास शिक्षण, कचरा, जयभवानीनगर येथील नाल्याच्या प्रश्नावर चर्चा घेण्यात आली. दुपारी अर्थसंकल्पावरील चर्चेला सुरुवात झाली. ज्येष्ठ नगरसेवक राजू शिंदे यांनी अर्थसंकल्पाची चिरफाड सुरू केली. मनपाचे उत्पन्न अवघे ७०० कोटी असताना प्रशासनाने १२७४ कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्याचे धाडस कसे केले. यावर प्रशासनाची मोठी कोंडी झाली. प्रशासनाकडे समर्पक उत्तर नसल्याने १.४५ वाजता सभा तहकूब करण्यात आली. दुपारी २.४५ वाजता परत सभेला सुरुवात झाली. तोपर्यंत लेखा विभागाने वाढीव अर्थसंकल्पाच्या प्रश्नातून आपली सुटका करून घेतली होती. तब्बल दोन तास अर्थसंकल्पातील वेगवेगळ्या पैलूंवर नगरसेवकांनी चर्चा केली. सहा वाजता महापौर नंदकुमार घोडेले यांनी १८६४ कोटी ८० लाख रुपयांच्या अर्थसंकल्पाला मंजुरी दिली. स्थायी समितीने सादर केलेल्या अर्थसंकल्पात ३८८ कोटी रुपयांची वाढ करण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले. १८६४ कोटी ८० लाख जमा आणि १८६३ कोटी २० लाख खर्च असा १ कोटी ६० लाख रुपये शिलकीच्या अंदाजपत्रकास मान्यता देण्यात येत असल्याचेही त्यांनी जाहीर केले.


आयुक्तांकडून १४३ कोटींची मागणी
मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी अर्थसंकल्पात हेरिटेजसाठी ३० कोटी, क्रीडांगणे विकसित करण्यासाठी २० कोटी, शिक्षण व आरोग्य विभागासाठी १० कोटी, घनकचरा व्यवस्थापनासाठी १३ कोटी (वाढीव), पाणीपुरवठा ५० कोटी, लोकसहभाग १० कोटी, प्राणी कल्याण १० कोटी रुपयांची मागणी महापौर नंदकुमार घोडेले यांच्याकडे केली. आयुक्तांच्या मागणीनुसार महापौरांनीही १०८ कोटींची तरतूद केली आहे. अर्थसंकल्पातील संकल्प
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची उंची वाढविणे, महात्मा बसवेश्वर, महाराणा प्रताप, महात्मा जोतिबा फुले-सावित्रीबाई फुले यांचे पुतळे उभारणे, सरदार वल्लभभाई पटेल यांचा पूर्णाकृती पुतळा उभारणे, बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक, अमरप्रीत चौकात शिल्प उभारणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकाचे सुशोभीकरण करणे.
काहीही करा उत्पन्न वाढवा
महापालिकेचे उत्पन्न वाढविले तरच विकासकामे करता येतील. त्यादृष्टीने काहीही करा उत्पन्न वाढवा, अशा सूचना सर्वसाधारण सभेत प्रशासनाला देण्यात आल्या. मालमत्तांचे सर्वेक्षण करा, एक लाखापेक्षा अधिक थकबाकीदारांना हप्ते पाडून वसुली करा, मनपाचे व्यापारी संकुल, मैदाने, सभागृह रेडिरेकनर दराने भाड्याने द्या, मंगल कार्यालये, खासगी क्लासेस, प्रतिष्ठाने यांना पार्किंगसाठी जागा भाडेतत्त्वावर द्याव्यात, शहरात कोठेही शाळा, बालवाड्या सुरू करण्यासाठी मनपाचे नाहरकत प्रमाणपत्र घेणे सक्तीचे करा, होर्र्डिंग, अवैध नळ कनेक्शनसाठी कारवाई करावी आदी सूचना प्रशासनाला महापौरांनी केल्या.

Web Title:  Aurangabad Municipal Corporation: The general body budget increased by 388 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.