महापालिकेचा कॅनॉट परिसरातील अतिक्रमणावर हातोडा; कारवाईच्या निषेधार्थ मार्केट बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2023 04:00 PM2023-01-13T16:00:52+5:302023-01-13T16:04:42+5:30
शहरात महापालिकेची अतिक्रमणविरोधात जोरदार मोहीम सुरु आहे.
औरंगाबाद: कॅनॉट मार्केटमधील सर्व दुकानांसमोर असलेले शेड काढण्याची कारवाई महापालिकेने आज सकाळी सुरू केली. अचानक सुरु झालेल्या कारवाईस व्यापाऱ्यांनी कडाडून विरोध दर्शविला. कारवाईच्या निषेधार्थ व्यापाऱ्यांनी मार्केट बंद केले आहे.
शहरात महापालिकेची अतिक्रमणविरोधात जोरदार मोहीम सुरु आहे. आज सकाळी मनपाचे अतिक्रमण विरोधी पथक शहरातील वर्दळीचा भाग कॅनॉट मार्केटमध्ये पोहचले. येथे व्यापाऱ्यांनी दुकानांच्या समोरील जागेत अतिक्रमण करून शेड उभारले आहे. मनपा पथकाने लागलीच शेड काढण्याची कारवाई सुरु केली. यामुळे एकच गोंधळ उडाला. व्यापाऱ्यांनी अतिक्रमण काढण्यास विरोध सुरु केला. यामुळे कारवाई काहीकाळ थांबविण्यात आली. प्रशासनाचा अतिक्रमण कारवाईच्या निषेधार्थ व्यापाऱ्यांनी कॅनॉट मार्केट बंद केले. सर्व व्यापारी याबाबत महापालिकेत धाव घेऊन प्रशासकांकडे दाद मागणार आहेत. दरम्यान, व्यापाऱ्यांनी स्वतःहून शेड काढून घेणे सुरु केल्याची माहिती आहे.
महापालिका परवानगीनेच शेड
महापालिकेतर्फे शेड उभारून देण्याचे सांगण्यात आले होते. मात्र, ते उभारण्यात आले नाही. त्यानंतर व्यापाऱ्यांनी स्वतः हँगिंग शेड उभारले. हे शेड अनेक वर्षांपासून आहेत. ऊन, पाऊस, वाऱ्यापासून सुरक्षा मिळावी म्हणून महापालिकेच्या परवानगीनेच हे हँगिंग शेड उभारण्यात आल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. हँगिंग शेड सोडून इतर अतिक्रमण काढण्यास विरोध नाही. असेही व्यापाऱ्यांनी स्पष्ट केले.
हायकोर्टाच्या आदेशाने कारवाई
सिडको- हडकोतील अतिक्रमणा संदर्भात औरंगाबाद हायकोर्टाने एक समिती गठीत केली होती. समितीच्या अहवालानंतर हायकोर्टाच्या आदेशाने महापालिकेने अतिक्रमण विरोधात कारवाई सुरु केली आहे. विरोधानंतर पथकाने स्वतःहून अतिक्रमण काढण्यासाठी व्यापाऱ्यांना तीन तासांची मुदत दिली. त्यानंतर पथक कारवाई करवाई करणार आहे. काही व्यापाऱ्यांनी स्वतःहून अतिक्रमण काढणे सुरु केले आहे. तसेच पथकाने जेसीबीच्या सहाय्याने मोठ्या अतिक्रमण काढले आहे.