औरंगाबाद महापालिकेने केले प्रत्येक वॉर्डात ६०० झाडे लावण्याचे नियोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2018 12:29 PM2018-06-06T12:29:16+5:302018-06-06T12:30:16+5:30
मनपानेही ६९ हजार झाडे लावण्याचे उद्दिष्ट निश्चित केले असून, त्यादृष्टीने नियोजन करण्यात आले.
औरंगाबाद : राज्य शासनाने यंदा १३ कोटी झाडे लावण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. मनपानेही ६९ हजार झाडे लावण्याचे उद्दिष्ट निश्चित केले असून, त्यादृष्टीने नियोजन करण्यात आले. मंगळवारी ईटखेडा भागात वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ महापौर नंदकुमार घोडेले यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
मनपा निव्वळ वृक्षारोपण न करता वर्षभर ही झाडे कशी जगवता येतील यावरही अधिक भर देणार असल्याचे उद्यान अधीक्षक विजय पाटील यांनी सांगितले. मागील वर्षीही महापालिकेने प्रत्येक वॉर्डात आणि दुभाजकांमध्ये झाडे लावली होती. ही झाडे जगविण्यासाठी स्वतंत्र कर्मचारी, टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता. ३० हजारपैकी १८ हजार झाडे जिवंत असल्याचा दावा मनपाने केला. यंदा वृक्ष लागवडीसाठी मागील तीन महिन्यांपासून उद्यान विभाग परिश्रम घेत आहे. मनपाने स्वत:च्या नर्सरीमध्ये कोणताही खर्च न करता तब्बल २५ हजार रोपे तयार केली आहेत.
याशिवाय वन विभागाकडून ४० हजार झाडांची मागणी करण्यात आली आहे. शहरात ११५ वॉर्ड आहेत. प्रत्येक वॉर्डात किमान ६०० झाडे लावण्याचे उद्दिष्ट ठेवून खड्डे करण्यात आले आहेत. जुन्या शहरातील अनेक वॉर्डांमध्ये झाडे लावण्यासाठी जागाच नाही. त्या बदल्यात सफारी पार्क येथे दहा हजार झाडे लावणार आहोत, असे विजय पाटील यांनी सांगितले.