डरकाळी फोडण्याची औरंगाबाद महापालिकेला गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 08:05 PM2018-11-12T20:05:42+5:302018-11-12T20:06:25+5:30
विश्लेषण : महापालिकेत प्रत्येक काम ‘डर’काळी फोडूनच होणार आहे का? हा सर्वात मोठा प्रश्न आहे. नागरिकांच्या हिताची ही डरकाळी असेल तर आयुक्तांनीही वारंवार अशा पद्धतीने पुढाकार घ्यायला हवा.
- मुजीब देवणीकर
महापालिकेत काम करणारे बहुतांश अधिकारी व कर्मचारी आता निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत. अंगलट येईल, असे कोणतेही काम न करता सुखाने दिवस काढायचे एवढे एकमेव धोरण या यंत्रणेने स्वीकारले आहे. राजकीय वैर नको, चौकशीचे झंजट नको, अशी साधीसरळ भूमिका घेण्यात आली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची प्रचंड कुचंबणा होत आहे. याचे साधे उदाहरण घ्यायचे झाले, तर सिडको-हडकोतील पाण्याच्या टाक्या अलीकडे भरतच नव्हत्या. मी स्वत: पाण्याच्या टाकीवर येऊन उभा राहतो अशी ‘डर’काळी आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी फोडताच रात्रभरातून टाकी पूर्ण क्षमतेने भरली. दिवाळीत नागरिकांना समाधानकारक पाणीही मिळाले. महापालिकेत प्रत्येक काम ‘डर’काळी फोडूनच होणार आहे का? हा सर्वात मोठा प्रश्न आहे. नागरिकांच्या हिताची ही डरकाळी असेल तर आयुक्तांनीही वारंवार अशा पद्धतीने पुढाकार घ्यायला हवा.
महापालिकेत सध्या कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांची संख्या ६० टक्के, तर कंत्राटी पद्धतीवर नेमण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या ४० टक्यांपर्यंत पोहोचली आहे. कंत्राटी कर्मचारी, अधिकारी यांच्यावर कोणतेच दायित्व नाही. त्यांच्यावर जबाबदारीही निश्चित करता येत नाही. लाच घेतानाही कर्मचारी रंगेहाथ पकडला गेला तरी मनपा काहीच करू शकत नाही. आपले काय होणार...या आविर्भावात ही मंडळी काम करीत आहे. थोडक्यात म्हणायचे तर टी-२० चा सामना खेळायला हे कर्मचारी महापालिकेत आले आहेत. वन-डे, टेस्ट मॅच खेळणारे अनुभवी कर्मचारी नवख्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची ‘बॅटिंग’ पाहून सध्या तरी अवाक् झाले आहेत. नगररचनासारख्या अत्यंत महत्त्वाच्या विभागात कंत्राटी कर्मचारी कनिष्ठ अभियंत्याच्या नावावरची फाईल घेऊन सबमिशन लिहितात...वरिष्ठ अधिकारीही डोळे बंद करून त्यावर सह्या करतात... हा सामना नेमका कोणत्या दिशेने चालला आहे.
महापालिकेत आलेल्या सर्वसामान्य नागरिकाला अजिबात न्याय देण्यात येत नाही. साधे जन्म-मृत्यू प्रमाणपत्रासाठी नागरिकांना शिफारस आणावी लागते. यापेक्षा आणखी मोठे दुर्दैव कोणते असू शकते. जन्म प्रमाणपत्रात स्पेलिंग मिस्टेक कोणी केलेल्या असतात? जेव्हा दुरुस्तीची वेळ येते तेव्हा अडवणूक कशासाठी होते. पैशासाठी असलेली ही मानसिकता संपूर्ण यंत्रणेला कुठेतरी बदलावी लागेल. जिथे आपण मीठ खातो त्या संस्थेशी निगडित नागरिकांना काही देणेही लागतो, याचे भान ठेवण्याची गरज आहे. मागील अनेक महिन्यांपासून सिडको-हडकोतील पाण्याच्या टाक्या का भरत नव्हत्या. अधिकारी व कर्मचाऱ्यांचीच इच्छाशक्ती नव्हती म्हणून भरत नव्हत्या. जेव्हा आयुक्त डॉ. निपुण विनायक स्वत: पाण्याच्या टाकीवर येतो म्हटले तर यंत्रणेच्या पायाखालची वाळू घसरली. पाण्याच्या टाक्यांवर असलेला अनागोंदी कारभार चव्हाट्यावर येईल. आपण कुठेतरी पकडले जाणार या भीतीने एका रात्रीतून एन-५ येथील पाण्याची टाकी पूर्ण क्षमतेने म्हणजेच ७ मीटरपर्यंत भरण्यात आली.
केंद्रेकर, बकोरियांनंतर निपुण...
महापालिकेत फक्त ९० दिवस सुनील केंद्रेकर यांनी काम केले. शहरात कुठेही ड्रेनेज लाईन तुंबलेली दिसल्यास संबंधित अधिकाऱ्याला संध्याकाळपर्यंतची मुभा ते देत असत. सायंकाळपर्यंत काम न झाल्यास दुसऱ्या दिवशी सकाळी घाण पाणी मी तुमच्या घरात आणून टाकीन, असा इशाराच ते देत असत. या इशाऱ्यामुळे अवघ्या तीन तासांत ड्रेनेज लाईन दुरुस्तही होत होती. ओम प्रकाश बकोरिया यांना रात्री प्रत्येक वॉर्डात जाऊन फेरफटका मारण्याची सवय होती. दुसऱ्या दिवशी संबंधित वॉर्डातील काम झालेच पाहिजे. रखडलेले काम असेल तर ते पूर्ण झालेच पाहिजे, असा त्यांचा आग्रह असायचा. आता डॉ. निपुण विनायक यांनीही ज्या पद्धतीने डरकाळी फोडली त्या पद्धतीने काम तर होत आहे. शहराच्या हितासाठी हे पाऊल असेल,तर त्यांनी आणखी पुढे येऊन काम करण्याची गरज आहे.