औरंगाबाद महापालिकेकडे १२ कोटीची वीजबिल थकबाकी; महावितरण देणार नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 01:52 PM2018-12-12T13:52:39+5:302018-12-12T13:54:25+5:30
महावितरण न्यायालयाच्या निर्देशानुसार महापालिकेने तात्काळ सव्वापाच कोटी रुपये भरावेत, या आशयाची नोटीस बजावणार आहे.
औरंगाबाद : महानगरपालिकेकडे शहरातील पथदिव्यांच्या वीज बिलापोटी ११ कोटी ९८ लाख रुपये थकले आहेत. दरम्यान, न्यायालयाच्या निर्देशानुसार महापालिकेने तात्काळ सव्वापाच कोटी रुपये भरावेत, या आशयाची नोटीस बजावणार आहे. जर महापालिकेने तेवढी रक्कम भरली नाही, तर पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यासाठी न्यायालयाकडून परवानगी मागितली जाईल, अशी माहिती महावितरणचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी दिली.
महानगरपालिकेच्या वीज बिलाच्या थकबाकीचे प्रकरण गेल्या वर्षी न्यायालयात गेले. त्यानंतर मनपाने दर महिन्याचे संपूर्ण वीज बिल व थकबाकीपैकी दर महिन्यास १ कोटी रुपये महावितरणकडे भरावेत, असे आदेश न्यायालयाने दिले होते. गेल्या आठ महिन्यांमध्ये मनपाने केवळ ११ कोटी ८ लाख रुपये भरले आहेत. अजूनही ५ कोटी २५ लाख रुपये बाकी आहेत. या सव्वापाच कोटींसह आॅक्टोबरअखेर ११ कोटी ९८ लाख रुपये थकबाकी आहे.