औरंगाबाद महानगरपालिका पुन्हा त्याच रस्त्यावर ओतणार तब्बल ३७ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2018 01:21 PM2018-11-30T13:21:34+5:302018-11-30T13:26:09+5:30

क्रांतीचौक ते रेल्वेस्टेशन या रस्त्यावर पालिकेने तीन वर्षांपूर्वी ३० कोटींचा खर्च केला.

Aurangabad Municipal Corporation will again pour 37 crores on the same road | औरंगाबाद महानगरपालिका पुन्हा त्याच रस्त्यावर ओतणार तब्बल ३७ कोटी

औरंगाबाद महानगरपालिका पुन्हा त्याच रस्त्यावर ओतणार तब्बल ३७ कोटी

googlenewsNext
ठळक मुद्देमनपाचा हा अट्टहास कशासाठी ? तीन वर्षांपूर्वीच क्रांतीचौक ते रेल्वेस्टेशन रस्ता झाला या रस्त्यावर ३० कोटींचा खर्च केला 

- विकास राऊत 

औरंगाबाद : क्रांतीचौक ते रेल्वेस्टेशन या रस्त्यावर पालिकेने तीन वर्षांपूर्वी ३० कोटींचा खर्च केला. आता तीन वर्षांतच त्या रस्त्यावर पुन्हा ३७ कोटींचा चुराडा करून तो रस्ता ‘स्मार्ट रोड’ म्हणून करायचे मनपाने ठरविले आहे. पैशांची उधळपट्टी फक्त एकाच रस्त्यावर करण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप विरोधकांनी सुरू केला आहे. 

स्मार्ट सिटी योजनेतून शहरात ‘स्मार्ट रोड’ बांधण्यासाठी स्पेशल पर्पज व्हेईकलच्या (एसपीव्ही) माहितीनुसार पहिल्या टप्प्यातील कामाची निविदा डिसेंबर महिन्यात निघणे अपेक्षित आहे. त्या शहरातील पहिला ‘स्मार्ट रोड’ म्हणून क्रांतीचौक ते रेल्वेस्टेशन या रस्त्यावर ३७ कोटींतून सुशोभीकरण करण्याचे सुचविले आहे. त्या रस्त्याला आधी तत्कालीन मनपा आयुक्त डॉ.पुरुषोत्तम भापकर यांचे नाव देण्याचा ठराव झाला. नंतर शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे महामार्ग असे रस्त्याचे नामकरण झाले. तो रस्ता आता सर्वप्रथम स्मार्ट रस्ता करण्याचे ठरविण्यात आले आहे. 

स्मार्ट सिटी, स्मार्ट रोड या संकल्पनेतून क्रांतीचौक ते रेल्वेस्टेशन, रेल्वेस्टेशन ते महावीर चौक आणि महावीर चौक ते क्रांतीचौक, असा त्रिकोणी रस्ता विकसित करण्याचा पूर्ण प्रस्ताव आहे. या कामाच्या पहिल्या टप्प्यात क्रांतीचौक ते रेल्वेस्टेशन या रस्त्याचे काम केले जाईल. क्रांतीचौक ते रेल्वेस्टेशन ते महावीर चौक मार्गे क्रांतीचौक हे ११ कि़ मी. अंतर आहे. हा त्रिकोण स्मार्ट रोड म्हणून विकसित करण्यासाठी सुमारे १०० कोटींचा खर्च शासन निधीतून केला जाणार आहे. त्यात क्रांतीचौक ते रेल्वेस्टेशन या ५ कि़ मी.च्या अंतरातील सुशोभीकरणावर ३७ कोटींची उधळपट्टी केली जाणार आहे. 

निविदा प्रक्रिया डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू होईल, असे महापौर नंदकुमार घोडेले यांनी गुरुवारी सांगितले. पहिल्या टप्प्यातील या रस्त्याच्या सुशोभीकरणावर सुमारे ३७ कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. त्याचे अंदाजपत्रकही पीएमसीने तयार केल्याचे घोडेले म्हणाले. स्मार्ट सिटी पीएमसीच्या डीपीआरनुसार रस्त्याच्या दोन्ही बाजूने फुटपाथ, सायकल ट्रॅक, आकर्षक लायटिंग, दुभाजकांत विशिष्ट पथदिवे, रंगरंगोटीची कामे केली जाणार आहेत. त्यामुळे क्रांतीचौक ते रेल्वेस्टेशन मार्गे महावीर चौक ते क्रांतीचौक हा स्मार्ट त्रिकोण पर्यटकांचे आकर्षण ठरेल, असा दावा महापौरांनी केला.

पश्चिम मतदारसंघच का?
सुरुवातीला ३० कोटींतून रस्ता केला गेला. आता पुन्हा पर्यटनाच्या नावाखाली त्रिकोणी रस्ता म्हणून १०० कोटींचे नियोजन करण्याचा प्रयत्न आहे. त्यातील ३७ कोटी क्रांतीचौक ते रेल्वेस्टेशनसाठी खर्च होणार आहेत. पश्चिम मतदारसंघात महापौर, सभापती, सभागृह नेते राहत असल्यामुळे हे नियोजन केले जात असल्याचे दिसते आहे. पूर्व, मध्य मतदारसंघासह फुलंब्री मतदारसंघात असलेल्या ८ वॉर्डांतील एकही रस्ता मनपाला आणि एसपीव्हीला का दिसला नाही, असा प्रश्न पुढे येतो आहे.

सुवर्णपथ ते स्मार्ट रोड
महापालिकेने शहरातील सर्वात मोठा ‘सुवर्णपथ’ म्हणून २०१२ ते २०१५ पर्यंत क्रांतीचौक ते रेल्वेस्टेशन या रस्त्यावर २५ ते ३० कोटींचा खर्च केला. २०११-१२ मध्ये वेगवेगळ्या दोन निविदा मंजूर करून ते कंत्राट जी.एन.आय. इन्फ्रा. प्रा. लि. ला दिले. १३ व्या वित्त आयोगाच्या निधीतून क्रांतीचौक ते इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनिअर्स ते पटवर्धन हॉस्पिटल ते रेल्वेस्टेशन ४० मी. रुंद विकास योजना रस्ता काँक्रीट व डांबरीकरणासह डिफर्ड पेमेंटवर विकसित केला. १६ कोटी ४२ लाख रस्त्यांची मूळ किंमत होती. साडेसात टक्के जादा दराने करून घेण्यात आले. कोकणवाडी ते एस.एस.सी. बोर्डापर्यंतचा रस्ता साडेसात कोटी रुपयांतून करण्यात आला. सहा वर्षे झाले, अजून रस्त्याचे काम अर्धवट आहे. शिवसेनेच्या एका पदाधिकाºयाने ते उर्वरित काम घेतले होते.

Web Title: Aurangabad Municipal Corporation will again pour 37 crores on the same road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.