पर्यटकांसाठी महापालिका पाच इलेक्ट्रिक बस खरेदी करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2020 07:13 PM2020-12-19T19:13:30+5:302020-12-19T19:15:05+5:30
पर्यटन विकासासाठीचा मास्टर प्लानदेखील युद्धपातळीवर तयार केला जाणार आहे.
औरंगाबाद : पर्यटकांसाठी स्मार्ट सिटी योजनेत पाच इलेक्ट्रिक बस खरेदी करण्यात येणार आहेत. जानेवारी अखेरपर्यंत बस शहरात दाखल होतील, सर्व बस वातानुकूलित पद्धतीच्या असणार आहेत. बस खरेदीसाठी महापालिका औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनची मदत घेणार असल्याची माहिती महापालिका प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी दिली.
पर्यटन विकासासाठीचा मास्टर प्लानदेखील युद्धपातळीवर तयार केला जाणार आहे.आस्तिककुमार पाण्डेय म्हणाले, राज्याचे पर्यटन व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आणि पालकमंत्री सुभाष देसाई यांनी गुरुवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक घेतली. त्यांनी शहरातील पर्यटन विकासाबद्दल काही आदेश दिले. यावेळी राज्यमंत्री अब्दुल सत्तारदेखील उपस्थित होते. शहराच्या पर्यटन विकासासंदर्भात मास्टर प्लान तयार करण्याची सूचना आदित्य ठाकरे यांनी केली. मास्टर प्लान तयार झाल्यावर त्याआधारे डीपीआर (सविस्तर प्रकल्प अहवाल) तयार केला जाईल. तयार करण्यात आलेला डीपीआर पर्यटन विभागाला सादर केला जाईल, असे पाण्डेय म्हणाले. दरम्यानच्या काळात औरंगाबाद शहरातील हेरिटेज रूट ठरविले जाणार आहेत. शहरातील ऐतिहासिक वास्तू, वारसा स्थळे यांचा त्यात समावेश असणार आहे.
औरंगाबादेत येणाऱ्या पर्यटकांसाठी हेरिटेज बस सुरू करण्याची सूचनादेखील आदित्य ठाकरे यांनी केली. औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या माध्यमातून पाच हेरिटेज बस खरेदी करा, या बस वातानुकूलित असाव्यात, असे आदेशदेखील यावेळी देण्यात आले, असा उल्लेख पाण्डेय यांनी केला. एक बस १२ मीटर लांबीची असणार आहे. प्रवाशाला बसचे तिकीट घेतल्यावर बसने प्रवास करताना बसमध्ये कुठूनही बसता येईल आणि कुठेही उतरता येणार आहे, त्यामुळे त्याला प्रत्येक ऐतिहासिक स्थळावर पुरेसा वेळ देणे शक्य होणार आहे. जानेवारी अखेरपर्यंत या बस दाखल होतील.
अधिकाऱ्यांसाठी भाडेतत्त्वावर इलेक्ट्रिक गाड्या
महापालिकेतील अधिकाऱ्यांसाठी वाहन खरेदीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. वाहन खरेदीवर कोट्यवधी रुपये खर्च होत आहेत. आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे हा प्रस्ताव रद्द करण्यात आला. केंद्र शासनाने नियुक्त केलेल्या एका कंपनीकडून भाडेतत्त्वावर आठ वर्षांसाठी इलेक्ट्रिक वाहन खरेदी करता येईल. एका वाहनाचे भाडे पंचवीस हजार रुपये आहे. यातून इंधनाचा खर्च वाचणार आहे, असेही पाण्डेय यांनी नमूद केले.