औरंगाबाद महापालिकेचे ॲप आले, आता घरबसल्या भरा पाणीपट्टी, मालमत्ता कर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2022 07:26 PM2022-04-25T19:26:46+5:302022-04-25T19:27:14+5:30
स्मार्ट सिटीच्या माध्यमातून एका कंपनीकडून जीआयएस मॅपिंगद्वारे मालमत्तांचे सर्वेक्षण सुरू आहे.
औरंगाबाद : मालमत्ताकर आणि पाणीपट्टी भरण्याची ऑनलाइन सुविधा महापालिकेने एका सॉफ्टवेअरच्या माध्यमातून विकसित केलेल्या ॲपद्वारे उपलब्ध करून दिल्यामुळे आता नागरिकांना घरबसल्या करभरणा करणे शक्य होणार आहे. २ लाख ८६ हजार मालमत्ताधारक आणि १ लाख २० हजार पाणीपट्टीधारकांचा डाटा ॲपवर अपलोड केला आहे, असे मनपा प्रशासकांनी सांगितले.
स्मार्ट सिटीच्या माध्यमातून एका कंपनीकडून जीआयएस मॅपिंगद्वारे मालमत्तांचे सर्वेक्षण सुरू आहे. त्या कंपनीकडूनच मालमत्ताकर आणि पाणीपट्टीचा डाटा ऑनलाइन केला जात असून त्यासाठी सॉफ्टवेअर विकसित केले आहे. पाणीपट्टीचा डाटा ॲपवर अपलोड झाला असून मालमत्ताधारकांचा डाटा २६ एप्रिलपर्यंत अपलोड होईल. त्यानंतर नागरिकांना घरबसल्या मालमत्ताकर आणि पाणीपट्टीची माहिती घेऊन बँक किंवा गुगल ॲपद्वारे कर भरता येणार आहे.
वर्षभराचा मालमत्ताकर एप्रिल महिन्यात भरल्यास त्या रकमेवर दहा टक्के सूट दिली जाते. तसेच मेमध्ये ८ टक्के, जूनमध्ये ६ टक्के सूट मिळते. ही सूट देण्याची सवलत एक महिना पुढे ढकलली आहे. एप्रिल महिन्याची १० टक्के सूट मे महिन्यात, मे मधील ८ टक्के सूट जून महिन्यात आणि जून महिन्याची ६ टक्के सूट जुलै महिन्यात मिळेल, असे प्रशासकांनी सांगितले.