औरंगाबाद मनपाचे सहायक नगर रचनाकार निलंबीत; फेसबुकवरील आक्षेपार्ह पोस्ट भोवली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 05:16 PM2018-02-22T17:16:40+5:302018-02-22T17:17:15+5:30
सहायक नगर रचनाकार जयंत खरवडकर यांनी फेसबुकवर नगरसेवकांबद्दल चुकीची पोस्ट टाकल्याच्या कारणावरून महापौर नंदकुमार घोडेले यांनी सर्वसाधारण सभेत त्यांना निलंबित करण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. यावर मनपा आयुक्त डी.एम. मुगळीकर यांनी निर्णय घेत खरवडकर यांना आज निलंबित केले.
औरंगाबाद : सहायक नगर रचनाकार जयंत खरवडकर यांनी फेसबुकवर नगरसेवकांबद्दल चुकीची पोस्ट टाकल्याच्या कारणावरून महापौर नंदकुमार घोडेले यांनी गुरुवारी (दि. १५ ) झालेल्या सर्वसाधारण सभेत त्यांना निलंबित करण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. यावर मनपा आयुक्त डी.एम. मुगळीकर यांनी निर्णय घेत खरवडकर यांना आज निलंबित केले.
१२ फेब्रुवारी रोजी खरवडकर यांनी आपल्या नावाने फेसबुकवर पोस्ट टाकली होती. त्यात ‘नालायक लोकांना सभागृह मिळाल्यानंतर ते तत्त्वज्ञानी बनून बेछुट आरोप करतात, यालाच लोकशाही म्हणतात’ असा मजकूर होता. या पोस्ट आधी झालेल्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी खरवडकर यांच्यासंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित करून कारवाईची मागणी केली होती. या पाश्वभूमीवर ही पोस्ट टाकण्यात आल्याने संतप्त झालेल्या नगरसेवकांनी त्यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. यानंतर आयुक्तांनी खरवडकरांना कारणे दाखवा नोटीस बजावून त्यांचे अधिकार गोठविले होते.
मात्र, खरवडकर यांच्या या पोस्टमुळे महापालिकेतील राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. याचे पडसाद गुरुवारी (दि.१५ ) झालेल्या सर्वसाधारण सभेतही उमटले. ११ नगरसेवकांनी यावर आपले मत व्यक्त केले. त्यातील नऊ जणांनी खरवडकर यांच्याविरोधात आगपाखड केली. दोन नगरसेवकांनी त्यांची बाजू मांडली. अखेर सभागृहाच्या भावना लक्षात घेऊन महापौर नंदकुमार घोडेले यांनी खरवडकर यांना निलंबित करण्याचे आदेश प्रशासनाला दिले. यावर निर्णय घेत मनपा आयुक्त डी.एम. मुगळीकर यांनी खरवडकर यांच्या निलंबनाचे आज आदेश दिले.