औरंगाबाद महानगरपालिकेची मोफत अंत्यविधी योजना पुन्हा सुरू होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2019 04:19 PM2019-01-09T16:19:12+5:302019-01-09T16:20:14+5:30
शहरात स्व. बाळासाहेब ठाकरे मोफत अंत्यविधी योजना आता पुन्हा सुरू होणार आहे.
औरंगाबाद : मागील साडेतीन वर्षांपासून बंद असलेली स्व. बाळासाहेब ठाकरे मोफत अंत्यविधी योजना आता पुन्हा सुरू होणार आहे. यासाठी विश्व हिंदू परिषदेने पुढाकार घेतला आहे. शहरातील सहा स्मशानभूमीमध्ये ही योजना वसुधा वुडलेस क्रिमेशन फाऊंडेशनच्या माध्यमातून प्रायोगिक तत्त्वावर राबविली जाणार आहे. ही संस्था विजेवर चालणारे यंत्र व गौऱ्यांद्वारे मृतांवर अंत्यविधी करणार आहे. त्यासंबंधीचा धोरणात्मक प्रस्ताव १८ जानेवारीच्या सभेत मंजुरीसाठी येणार आहे.
२०१४ मध्ये तत्कालीन महापौर कला ओझा व उपमहापौर संजय जोशी यांनी पुढाकार घेत मोफत अंत्यविधी योजनेस सुरुवात केली होती. स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने योजना सुरू झाली होती. वर्षभरानंतर ही योजना बंद पडली.
दरम्यान, विश्व हिंदू परिषदेने या योजनेसाठी आर्थिक मदत करण्याचा प्रस्ताव पालिकेसमोर ठेवला. विश्व हिंदू परिषदेचे राजेश जैन व वसुधा वुडलेस क्रिमेशन फाऊंडेशनचे व्यवस्थापक अभिषेक उटांगडे यांनी महापौर नंदकुमार घोडेले यांच्याशी चर्चा करून प्रायोगिक तत्त्वावर शहरात सहा ठिकाणी मोफत अंत्यविधी योजना राबविण्याची तयारी दर्शवली आहे.
प्रतापनगर, कैलासनगर, एन-६, बनेवाडी, मुकुंदवाडी, पुष्पनगरी या सहा ठिकाणी मशीन सीएसआर फंडातून बसविण्यात येणार आहेत. एका पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यास साडेचार हजार रुपयांचा खर्च येतो. निम्मा खर्च संबंधित संस्था उचलणार असून, उर्वरित खर्च पालिकेकडून दिला जाणार असल्याचे महापौरांनी सांगितले. खर्चासंबंधीचा धोरणात्मक प्रस्ताव १८ जानेवारीच्या सभेत ठेवून त्यावर निर्णय घेतला जाईल, असेही महापौरांनी नमूद केले.