औरंगाबाद मनपाचे मान्सूनपूर्व कामाचे पितळ उघडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 01:37 PM2018-06-23T13:37:07+5:302018-06-23T13:37:54+5:30
शहरात गुरुवारी रात्री झालेल्या जोरदार पावसानंतर शुक्रवारीही सायंकाळी तासभर मुसळधार पाऊस झाला.
औरंगाबाद : शहरात गुरुवारी रात्री झालेल्या जोरदार पावसानंतर शुक्रवारीही सायंकाळी तासभर मुसळधार पाऊस झाला. या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाल्याने उकाड्यापासून नागरिकांची सुटका झाल्याचे एकीकडे चित्र असले तरी शुक्रवारी गुलमंडी, टिळकपथ, टाऊन हॉल, समर्थनगर भागांत पाणीचपाणी झाले होते.
गुरुवारी रात्री आणि शुक्रवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसाने शहरातील तब्बल २२ पेक्षा अधिक वसाहतींमध्ये पाणी शिरले. शेकडो नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्याने जिकडे तिकडे महापालिकेच्या नालेसफाईवर जोरदार आरोप करण्यात येत होता. अग्निशमन दल, सामाजिक कार्यकर्त्यांनी मिळून ठिकठिकाणी नागरिकांना मदत केली. शरीफ कॉलनी, रोशनगेट, किराडपुरा, पोलीस नियंत्रण कक्ष, नूर कॉलनी, चेतक घोडा, गणेश कॉलनी, मजनू हिल आदी अनेक वसाहतींमध्ये नाल्याचे पाणी शिरले.
नारेगाव भागातील अजीज कॉलनीत तर नाल्यापासून एक किलोमीटर लांब वसाहतीत पाणी शिरले. प्रत्येक घरात गुडघ्याएवढे पाणी साचले होते. नालेसफाईच्या कामात महापालिकेने १ कोटी ७० लाख रुपयांचा चुराडा कुठे केला, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. दरवर्षी नालेसफाईचे काम एकाच कंत्राटदाराला का देण्यात येत आहे, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. ८० नाले सफाई केल्याचा मनपाचा दावाही फोल ठरला.
गुरुवारी रात्री अग्निशमन विभागाला १८ वसाहतींमध्ये पाणी शिरल्याची तक्रार प्राप्त झाली. पहाटेपर्यंत अधिकारी व कर्मचारी मोटारी लावून पाणी काढून देण्याचे काम करीत होते. शुक्रवारी सायंकाळी झालेल्या पावसानंतर पाच तक्रारी प्राप्त झाल्या. रात्री उशिरापर्यंत पैठणगेट आदी दुकानांमधील पाणी काढून देण्यात येत होते.