औरंगाबाद महापालिकेचा असाही विक्रम.... महिलांसाठीच्या पाच शौैचालयांचे बांधकाम तीन वर्षांनंतरही अपूर्ण...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 11:00 PM2018-10-20T23:00:39+5:302018-10-20T23:04:51+5:30
शहरातील लाखो महिलांसाठी तीन वर्षांपूर्वी पाच स्वच्छतागृह बांधण्याचे काम सुरू केले. अद्यापपर्यंत हे काम पूर्ण न झाल्याने शनिवारी सर्वसाधारण सभेत संतप्त नगरसेविकांनी मनपा प्रशासनाच्या कारभाराचे अक्षरश: वाभाडे काढले.
औरंगाबाद : शहरातील लाखो महिलांसाठी तीन वर्षांपूर्वी पाच स्वच्छतागृह बांधण्याचे काम सुरू केले. अद्यापपर्यंत हे काम पूर्ण न झाल्याने शनिवारी सर्वसाधारण सभेत संतप्त नगरसेविकांनी मनपा प्रशासनाच्या कारभाराचे अक्षरश: वाभाडे काढले. महापौर नंदकुमार घोडेले यांनी उपअभियंता अफसर सिद्दीकी यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश दिले. खुलासा समाधानकारक नसेल तर निलंबन करा, असेही आदेश प्रशासनाला दिले.
शनिवारी सर्वसाधारण सभेला सुरुवात होताच शिल्पाराणी वाडकर यांनी स्वच्छतागृहांचा मुद्या उपस्थित केला. स्वच्छतागृहांचा प्रश्न मार्गी लावल्याशिवाय सभा चालू देणार नाही, अशी ताठर भूमिका सर्व महिलांनी घेतली. सीमा खरात यांनी नगरसेविकांची सभागृहात मोठी संख्या असताना कामे होत नसल्याची लाज वाटते, अशा भावना व्यक्त केल्या. संगीता वाघुले, माधुरी अदवंत यांच्यासह इतरांनी प्रशासनाची कोंडी केली. अफसर सिद्दीकी यांनी खुलासा केला, पण सदस्यांचे समाधान झाले नाही. स्वच्छतागृहांची कामे करता येत नसतील तर राजीनामा द्यावा, अशी मागणी राजेंद्र जंजाळ यांनी केली. प्रशासनाने वाद नसलेल्या जागा आम्हाला द्याव्यात, त्याठिकाणी स्वच्छतागृह उभारून घेऊ, असे राजू वैद्य यांनी सांगितले. सिडको एन-७ येथील महापालिकेच्या शाळेत साडेचारशे विद्यार्थ्यांसाठी एकच स्वच्छतागृह असल्याचा आरोप माधुरी अदवंत यांनी केला. विमानतळ प्राधिकरणाने दिलेल्या पैशांचे काय झाले, असा प्रश्न त्यांनी केला असता प्राधिकरणाकडून ८३.५० लाख रुपयांपैकी ५८ लाख ९५ हजारांचा निधी मिळाला आहे. आठ ठिकाणी बांधकाम पूर्ण झाले असून, नऊ ठिकाणी काम करण्यात येत आहे, असे सिद्दीकी यांनी सांगितले.
--------------