औरंगाबाद पालिका निवडणूक; सुप्रिम कोर्टात ९ मार्चला सुनावणी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2021 06:15 AM2021-02-03T06:15:02+5:302021-02-03T06:15:35+5:30
Aurangabad municipal elections : औरंगाबाद महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेत मंगळवारी पुढील तारीख ९ मार्च देण्यात आली आहे.
औरंगाबाद : महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेत मंगळवारी पुढील तारीख ९ मार्च देण्यात आली आहे. याचिकेत एकूण आठ जणांना प्रतिवादी करण्यात आले आहे. त्यापैकी तीन जणांचे शपथपत्र न्यायालयासमोर सादर करण्यात आले आहे. उर्वरित पाच शपथपत्रे अद्यापपर्यंत प्राप्त झालेली नाहीत. त्यामुळे मार्च- एप्रिलमध्ये निवडणुका होतील, असा फक्त कयास लावण्यात येत होता.
एप्रिल २०२० मध्ये पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका घेण्याचे निश्चित करण्यात आले होते. निवडणुकीसाठी सर्व प्रक्रिया राज्य निवडणूक आयोगाने पूर्ण केली होती. या प्रक्रियेला अगोदर खंडपीठात आव्हान देण्यात आले. नंतर सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. न्यायालयाने निवडणुकीची परिस्थिती ‘जैसे थे’ ठेवा, असा आदेश दिला आहे.
मार्च-एप्रिलमध्ये निवडणूक अशक्य
मागील महिन्यात राज्य शासनाच्या प्रतिनिधींकडून मार्च- एप्रिलमध्ये महापालिकेची निवडणूक होईल, असे संकेत दिले. न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांमुळे मार्च- एप्रिलमध्ये निवडणूक होण्याची शक्यता कमी आहे. कारण १२ एप्रिलपासून मुस्लीम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू होत आहे. महाविकास आघाडी सरकारमधील दोन घटक पक्ष एप्रिलमध्ये निवडणुका घेण्यास सहमती देण्याची शक्यता नाही.