मनपा कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार; दरवर्षीप्रमाणे भेट आणि अग्रिम वाटप मिळणार
By मुजीब देवणीकर | Published: October 7, 2022 02:55 PM2022-10-07T14:55:31+5:302022-10-07T14:56:31+5:30
दिवाळीनिमित्त दरवर्षी पात्र कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान, दिवाळी गिफ्ट आणि दिवाळी ॲडव्हान्स देण्याची महापालिकेत परंपरा आहे.
औरंगाबाद : महापालिका कर्मचाऱ्यांना दरवर्षीप्रमाणे दिवाळीपूर्वी सानुग्रह अनुदान, फेस्टिव्हल ॲडव्हान्स दिला जाणार आहे. यासाठी पालिकेच्या तिजोरीवर सुमारे अडीच कोटींचा बोजा पडणार आहे. बहुजन कामगारशक्ती महासंघाने चार दिवसांपूर्वी प्रशासनाकडे निवेदनाद्वारे बोनस आणि अग्रिम देण्याची मागणी केली होती.
दिवाळीनिमित्त दरवर्षी पात्र कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान, दिवाळी गिफ्ट आणि दिवाळी ॲडव्हान्स देण्याची महापालिकेत परंपरा आहे. त्यानुसार यंदादेखील हे सर्व लाभ कर्मचाऱ्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पालिकेचे प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांनीच ही माहिती दिली.
या संदर्भात मुख्य लेखाधिकारी संतोष वाहुळे म्हणाले, रविवारी प्रशासकांनी बैठक घेतली आणि त्या बैठकीत कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदानासह अन्य लाभ दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर देण्याचे आदेश दिले आहेत. त्यांच्या आदेशानुसार लेखा विभागाने तयारी सुरू केली आहे. सर्व विभागांना पत्र पाठवून त्यांच्याकडून संबंधित कर्मचाऱ्यांची माहिती मागविण्यात आली आहे. पुढील आठवड्यात ही माहिती प्राप्त झाल्यावर प्रशासकांनी दिलेल्या आदेशाच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने कार्यवाही केली जाईल.
मिळालेल्या माहितीनुसार सानुग्रह अनुदानासह अन्य आर्थिक लाभ कर्मचाऱ्यांना देण्यासाठी सुमारे अडीच कोटी रुपये लागणार आहे. त्याची जुळवाजुळव लेखा विभागाला करावी लागेल. त्यामुळे दिवाळीच्या काही दिवस अगोदर कर्मचाऱ्यांना हे आर्थिक लाभ दिले जातील.