औरंगाबाद महापालिकेचे टँकर संपावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 12:21 AM2018-07-21T00:21:44+5:302018-07-21T00:22:24+5:30
शहरातील ११० पेक्षा अधिक वसाहतींमधील सुमारे ३ लाख नागरिकांची तहान टँकरद्वारे भागविण्यात येते. महापालिकेने टँकर कंत्राटदाराला मागील चार महिन्यांपासून बिल न दिल्याने त्यांनी अनेकदा प्रशासनाला तोंडी, लेखी सूचना केली. प्रशासनाने त्याकडे नेहमीप्रमाणे दुर्लक्ष केले. शुक्रवारी कंत्राटदाराने संपाचे हत्यार उपसले.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : शहरातील ११० पेक्षा अधिक वसाहतींमधील सुमारे ३ लाख नागरिकांची तहान टँकरद्वारे भागविण्यात येते. महापालिकेने टँकर कंत्राटदाराला मागील चार महिन्यांपासून बिल न दिल्याने त्यांनी अनेकदा प्रशासनाला तोंडी, लेखी सूचना केली. प्रशासनाने त्याकडे नेहमीप्रमाणे दुर्लक्ष केले. शुक्रवारी कंत्राटदाराने संपाचे हत्यार उपसले. शुक्रवारी ज्या वसाहतींना टँकरद्वारे पाणीपुरवठा करायचा होता, त्यांना पाणी देता आले नाही. महापालिकेने पर्यायी व्यवस्थाही न केल्याने नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे.
महापालिका अगोदरच कचरा प्रशासनात बरीच संकटात सापडली आहे. दोन दिवसांआड पाणीपुरवठ्याच्या मुद्यावर तळ्यातमळ्यात सुरू आहे. वारंवार जलवाहिन्या फुटत असल्याने पाणीपुरवठा विभागाची अधिक गोची झाली आहे. त्यातच शुक्रवारी अचानक टँकरचालकाने संप पुकारला. त्यामुळे महापालिकेत एकच खळबळ उडाली. महापालिकेने ज्या वसाहतींमध्ये जलवाहिन्या टाकलेल्या नाहीत, त्या वसाहती मागील अनेक वर्षांपासून टँकरवर अवलंबून आहेत. महापालिका नागरिकांकडून अगोदरच पैसे भरून घेते. एक दिवसाआड टँकरद्वारे दोन ड्रम प्रत्येकाला पाणी देण्यात येते. सिडको एन-७ येथील पाण्याच्या टाकीवरून १८ टँकर चालविण्यात येतात. एक टँकर दररोज पाच ट्रीप पाणीपुरवठा करीत असतो. एन-५ येथील पाण्याच्या टाकीवर ३४ टँकर आहेत. येथील टँकर दिवसभरात १७० ट्रीप पाणीपुरवठा करतात. कोटला कॉलनी येथून सुमारे १८ टँकरद्वारे पाणीपुरवठा होतो. सातारा-देवळाई भागातही नागरिकांची तहान भागविण्यासाठी याच कंत्राटदाराची नेमणूक केली आहे. शुक्रवारी टँकरचा पाणीपुरवठा बंद झाल्याने नागरिकांनी एन-७ आणि एन-५ येथील पाण्याच्या टाकीवर धाव घेतली. कंत्राटदाराने संप पुकारल्याची माहिती नागरिकांना मनपा प्रशासनाकडून देण्यात आली. आम्ही अॅडव्हान्स पैसे भरले आहेत. महापालिकेने पर्यायी व्यवस्था करून पाणी द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली. मात्र, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही मागणी धुडकावून लावली.
या वसाहती टँकरवर
हर्सूल, गारखेडा, विजयनगर, पडेगाव, मिटमिटा, जयभवानीनगर, संघर्षनगर, नक्षत्रवाडी, सातारा-देवळाई आदी भागांतील वसाहतींना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो.