महापालिका ॲक्शन मोडवर; दररोज २ हजारांवर कोरोना टेस्ट, शहराचा पाॅझिटिव्हिटी रेट एक टक्क्यांपेक्षा कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2021 01:53 PM2021-12-30T13:53:19+5:302021-12-30T13:53:48+5:30
Corona Virus in Aurangabad : ग्रामीण भागांत संशयितांच्या तपासण्याचे प्रमाण घटले
औरंगाबाद : ओमायक्राॅनमुळे ( Omicron Variant ) महापालिकेची आरोग्य यंत्रणा ॲक्शन मोडवर आली आहे. शहरात रोज दोन हजारांवर संशयितांची कोरोना टेस्ट केली जात आहे (Corona Virus in Aurangabad ) . मात्र, पाॅझिटिव्हिटी रेट एक टक्क्यांपेक्षा कमी असल्याने काहीसा दिलासा मिळत आहे.
जिल्ह्यात ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरात रोज सर्वाधिक कोरोना टेस्ट होत आहे. सर्वाधिक तपासण्या होऊनही शहरात नवे रुग्ण आढळण्याचे प्रमाण कमी आहे. शहरात एकीकडे रोज हजार संशयितांच्या तपासण्या होत आहेत, तर त्या तुलनेत ग्रामीण भागात अवघ्या पाचशे ते सहाशे तपासण्या होत आहे. ग्रामीण भागात लसीकरण वाढविण्याचा प्रयत्न आरोग्य यंत्रणा करीत आहे. मात्र, यात कोरोना तपासण्याचे प्रमाण कमी होत असल्याची चिंता व्यक्त होत आहे.
परदेशवारी करून येणाऱ्यांवर मनपाची करडी नजर
ओमायक्राॅनच्या संकटामुळे महापालिकेची आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून, गेल्या काही दिवसांपासून परदेशातून परतणाऱ्या प्रवाशांवर करडी नजर ठेवली जात आहे. जिल्ह्यात दाखल झाल्यानंतर प्रत्येक प्रवाशाची कोरोना तपासणी केली जात आहे. यात कोरोना पाॅझिटिव्ह आढळणाऱ्या रुग्णांचे स्वॅब ‘आयसीएमआर’ आणि ‘एनआयव्ही’ला पाठविण्यात येत आहेत.
शहरात सर्वाधिक तपासण्या
शहरात रोज दोन ते अडीच हजार संशयित रुग्णांच्या कोरोना तपासण्या करण्यात येत आहेत. ग्रामीण भागाच्या तुलनेत ही संख्या निश्चितच अधिक आहे. तपासणीचे प्रमाण वाढविण्यावर भर आहे.
- डाॅ. पारस मंडलेचा, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, मनपा
संशयितांची तपासणी
ग्रामीण भागात रोज पाचशे ते सहाशे जणांच्या कोरोना तपासण्या करण्यात येत आहे. दुसरा डोस घेतलेला आहे म्हणून अनेकजण तपासणीकडे दुर्लक्ष करतात. परंतु लक्षणे असेल तर तपासणी करून घेतली पाहिजे. खासगी रुग्णालयांतही संशयितांच्या तपासण्या करण्यात येत आहे.
- डाॅ.अभय धानोरकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी
ग्रामीण भागातील कोरोना तपासणीची स्थिती
तारीख- कोरोना टेस्ट-पाॅझिटिव्ह-पाॅझिटिव्हिटी रेट
२४ डिसेंबर-५३८-०-०.००
२५ डिसेंबर-२६६-३-१.१३
२६ डिसेंबर-१२५-२-१.६०
२७ डिसेंबर-६८१-०-०.००
२८ डिसेंबर-४८९-०-०.००
शहरातील कोरोना तपासणीची स्थिती
तारीख- कोरोना टेस्ट-पाॅझिटिव्ह-पाॅझिटिव्हिटी रेट
२४ डिसेंबर-१९२२-२-०.१०
२५ डिसेंबर-१७५२-६-०.३४
२६ डिसेंबर-२४२०-१०-०.४१
२७ डिसेंबर-२५१८-४-०.१६
२८ डिसेंबर-२११७-९-०.४३