कचऱ्यावर प्रक्रिया न करताही महापालिकेने खाजगी कंपनीस दिले ३५ लाख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 04:38 PM2019-07-15T16:38:50+5:302019-07-15T16:44:53+5:30
नगरसेवकांनी या आर्थिक व्यवहाराबाबत प्रशासनाची चांगलीच कोंडी केली.
औरंगाबाद : शहरात प्रचंड कचरा कोंडी निर्माण झालेली असताना महापालिका आयुक्त डॉक्टर निपून विनायक यांनी नॉलेज लिंक या खाजगी कंपनीला हरसुल, पडेगाव, चिकलठाणा आदी ठिकाणी साचलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया करावी म्हणून करार केला होता. या कंपनीने कचऱ्यावर कोणतीच प्रक्रिया केलेली नसताना तब्बल 35 लाख रुपयांचे बिल या कंपनीला देण्यात आल्याचे आज महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत उघड झाले.
नगरसेवकांनी या आर्थिक व्यवहाराबाबत प्रशासनाची चांगलीच कोंडी केली. स्थायी समितीची मान्यता नसताना लाखो रुपयांचे व्यवहार परस्पर विनानिविदा आयुक्तांनी कसे केले यावर प्रशासनाला समाधानकारक उत्तर देता आले नाही. आयुक्तांना आपल्या अधिकारांमध्ये लाखो रुपयांची कामे मर्जीतील कंपन्यांना आणि ठेकेदारांना द्यायचे असतील तर आमच्या वार्डातील कामेही परस्पर देण्यात यावी. निविदा प्रक्रिया राबवून कशासाठी वेळ वाया घालवतात असा टोलाही नगरसेवक राजेंद्र जंजाळ यांनी यावेळी मारला.