औरंगाबाद मनपा शाळा गुणवत्तेत ‘नापास’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2018 07:41 PM2018-07-04T19:41:37+5:302018-07-04T19:42:47+5:30
महापालिका शाळांना लागूनच खाजगी शाळांचे पेव फुटले आहे. खाजगी शाळांच्या स्पर्धेत मनपाच्या शाळा आता तग धरायला तयार नाहीत. चार शाळांमध्ये विद्यार्थी संख्या अत्यंत कमी असल्याने त्या बंद करण्यात येणार आहेत.
औरंगाबाद : महापालिका शाळांना लागूनच खाजगी शाळांचे पेव फुटले आहे. खाजगी शाळांच्या स्पर्धेत मनपाच्या शाळा आता तग धरायला तयार नाहीत. चार शाळांमध्ये विद्यार्थी संख्या अत्यंत कमी असल्याने त्या बंद करण्यात येणार आहेत. उस्मानपुरा, विष्णूनगर, हनुमाननगर, एन-७ येथील चार शाळांचा यामध्ये समावेश आहे.
मागील काही वर्षांपासून महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थी संख्या झपाट्याने कमी होत चालली आहे. विद्यार्थी संख्या कशी वाढेल यादृष्टीने प्रशासन, सत्ताधाºयांकडून कधीच प्रयत्न करण्यात आलेले नाहीत. शहरातील अनेक खाजगी शाळा आजही विविध वसाहतींमध्ये जाऊन विद्यार्थ्यांचा शोध घेतात. आमच्याच शाळेत प्रवेश घ्यावा म्हणून पालकांना साकडे घालतात. महापालिकेचे शिक्षक कधीच असे प्रयत्न करताना दिसून येत नाहीत. त्यामुळे शहरातील चार शाळा बंद करण्याची नामुष्की प्रशासनावर ओढावली आहे.
शहरात मनपाच्या ७१ शाळा आहेत. मनपा शाळांमधील असुविधा, गुणवत्ता यामुळे अनेक पालक प्रवेश घेण्यास नकार देतात. खाजगी शाळांच्या स्पर्धेत मनपा शाळा अजिबात तग धरायला तयार नाहीत. यंदाच्या शैक्षणिक वर्षात तर काही शाळांमधील संख्या पन्नासच्याही आत आली आहे. यात उस्मानपुरा, विष्णूनगर, हनुमाननगर आणि सिडको एन-७ या शाळांचा समावेश आहे.
या शाळा बंद करण्याचा विचार मनपाच्या शिक्षण विभागाकडून सुरू आहे. या शाळांमधील विद्यार्थी आणि शिक्षकांना मनपाच्या दुसºया शाळांमध्ये सामावून घ्यावे, असा प्रस्ताव शिक्षण विभागाकडून बनविण्यात येत आहे. या निर्णयास अजून पदाधिकारी आणि आयुक्तांनी मंजुरी दिलेली नाही. सिडको एन-७ येथील शाळेची इमारत एका खाजगी संस्थेला शाळाच चालविण्यासाठी देण्याचा पराक्रमही मनपाने केला आहे, हे विशेष.
घटती विद्यार्थी संख्या
दहा वर्षांपूर्वी मनपाच्या शाळांमध्ये २५ हजारांहून अधिक विद्यार्थी होते. दरवर्षी विद्यार्थी संख्येला मोठ्या प्रमाणात गळती लागत आहे. या गळतीकडे प्रशासन अजिबात लक्ष द्यायला तयार नाही. सध्या ७१ शाळांमध्ये फक्त १७ हजार ५०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. नारेगाव, किराडपुरा, प्रियदर्शिनीनगर, मिटमिटा येथील मनपाच्या शाळांमध्ये विद्यार्थी संख्या आवश्यकतेपेक्षाही जास्त आहे.