दीड कोटींचा मालमत्ता कर थकल्याने ‘वायएसके’ला पालिकेने ठोकले सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2020 12:52 PM2020-01-04T12:52:54+5:302020-01-04T12:56:06+5:30
थकबाकीमुळे कर वसुली अभियान सुरू असल्याचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी स्पष्ट केले.
औरंगाबाद : महापालिकेने भाजप पदाधिकाऱ्याच्या निगडित असलेल्या भगवान शिक्षण प्रसारक मंडळाच्या (वायएसके कॅम्पस) प्रशासकीय कार्यालयांना शुक्रवारी सील ठोकले. १ कोटी ५१ लाख ५७ हजार २६४ रुपयांच्या थकीत मालमत्ता कर वसुलीसाठी ही कारवाई करण्यात आल्याचे मनपाने कळविले आहे. तसेच भोगवटा प्रमाणपत्राच्या अनुषंगाने सदरील संस्थेकडे थकीत असलेली रक्कम दंडासह वसूल करण्याचेही प्रकरण प्रलंबित आहे. एवढी मोठी रक्कम एखाद्या संस्थेकडे असताना मनपा आजवर राजकीय दबावामुळे शांत असल्याचे स्पष्ट झाले आहे. पालिकेतील शिवसेना-भाजप विरोधातील राजकीय पडसाद अशा पद्धतीने उमटू लागल्याची चर्चा सुरू झाली आहे.
थकीत रकमेपैकी ९ लाख ७७ हजार ६९२ रुपये भरण्यात आले आहेत. व्यवस्थापकाचे दालन, फार्मसी कॉलेजचे कार्यालय, प्रशासकीय कार्यालय मनपाने सील केले आहे. मुलींचे वसतिगृह सील केले नाही. असे वॉर्ड ‘फ’चे अधिकारी महावीर पाटणी यांनी सांगितले. तसेच भोगवटा प्रकरणातील थकबाकी आणि न्यायालयीन प्रक्रियेबाबत नगररचना विभागाकडे माहिती असल्याचे त्यांनी नमूद केले. महापालिकेच्या तिजोरीत सध्या खडखडाट आहे. कर थकबाकीचा आकडा साडेपाचशे कोटींच्या घरात आहे तर यंदाची थकबाकी तब्बल दीडशे कोटी रुपये एवढी आहे. ३०० कोटी रुपयांची मनपाला देणी आहे. मालमत्ता कर वसुली, भोगवटा शुल्क वसुलीविना पालिकेच्या तिजोरीत मोठ्या प्रमाणात रक्कम येणार नाही. त्यामुळे आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांनी कर वसुलीकडे मोर्चा वळविला आहे. आयुक्तांच्या आदेशानुसार शुक्रवारी प्रभाग कार्यालय ‘फ’चे वॉर्ड अधिकारी पाटणी यांच्या पथकाने भगवान शिक्षण प्रसारक मंडळाच्या चार कार्यालयांना सील ठोकले. थकीत रक्कम भरण्यासाठी वारंवार मागणी करूनही संस्थेने मनपाला टोलविले. त्यामुळे कारवाई केल्याचे त्यांनी सांगितले.
भाजप पदाधिकाऱ्याशी निगडित संस्था
भगवान शिक्षण प्रसारक मंडळ भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड यांच्या नातेवाईकांच्या संबंधित आहे. या कारवाईप्रकरणी कराड यांनी महापौरांशी फोनवरून संपर्क केल्याचे वृत्त आहे. दरम्यान महापालिका प्रशासनाने केलेली कारवाई ही प्रशासकीय कारवाई आहे. यात राजकीय सूडाचा विषय नाही. थकबाकीमुळे कर वसुली अभियान सुरू असल्याचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी स्पष्ट केले.