निलंबनाच्या भीतीने महापालिकेची यंत्रणा अखेर लागली कामाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2019 05:56 PM2019-12-23T17:56:32+5:302019-12-23T18:05:48+5:30
शहरातील छोटी-छोटी कामे होण्यास सुरुवात
औरंगाबाद : ड्रेनेज चोकअप झाल्यानंतर दूषित पाणी अनेक दिवस रस्त्याने वाहू लागले तरी मनपाची यंत्रणा त्याकडे लक्ष देत नव्हती. पाणीपुरवठ्याच्या व्हॉल्व्हमधून वर्षानुवर्षे पाणी वाहत होते तरी मनपाची यंत्रणा निद्रिस्तच होती. साफसफाईकडे अक्षम्य दुर्लक्ष करण्यात येत होते. सफाई कामगार शहरात आहेत किंवा नाही, अशी परिस्थिती होती. मनपा आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांनी पदभार घेतल्यापासून यंत्रणेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना यापुढे फक्त काम म्हणजे कामच करावे लागेल, असा निर्वाणीचा इशारा दिला. काम करायचे नसेल तर निलंबनास सामोरे जावे लागेल, असेही सांगितले आहे. त्यामुळे मनपाची यंत्रणा कामाला लागली आहे.
कालपर्यंत शहरात महापालिका आहे किंवा नाही, अशी परिस्थिती होती. वॉर्ड कार्यालयांकडून जी कामे अपेक्षित होती ती अजिबात होत नव्हती. जिथेतिथे ड्रेनेजचे पाणी वाहणे, चार ते पाच दिवस कचराच न उचलणे, दुभाजकातील झाडे वाढली तरी त्याकडे दुर्लक्ष, दुभाजकाच्या बाजूला वर्षानुवर्षे माती पडून राहणे, फुटपाथवर गवत वाढले तरी सफाई कामगारांकडून लक्ष न देणे, पाणीपुरवठ्याच्या व्हॉल्व्हमधून वर्षानुवर्षे पाणी वाहत राहणे. मनपाच्या ताब्यात असलेल्या पथदिव्यांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष, अशी अनेक काम प्रलंबित राहत होती. मनपा आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांनी पदभार घेतला त्याच दिवशी कॅरिबॅगच्या मुद्यावरून आपल्याच अधिकाऱ्याला पाच हजार रुपये दंड लावला.
दुसऱ्या दिवशी लोकप्रतिनिधींना पाचशे रुपये दंड लावला. त्यानंतर आयुक्तांनी वॉर्डनिहाय दौरा सुरू केला. दौऱ्यात शेकडो मालमत्तांना कर लागलेला नाही, व्यावसायिक मालमत्तेला घरगुती कर, अनधिकृत नळ, नाल्यांमध्ये कचरा, असे विदारक चित्र ठिकठिकाणी दिसून आले. त्यामुळे आयुक्तांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना यापुढे फक्त कामच करावे लागेल, अशी सक्त ताकीद दिली. त्यामुळे वॉर्ड कार्यालयांसह मनपा मुख्यालयातील यंत्रणा चांगलीच कामाला लागली. वॉर्डातील स्वच्छता पूर्वीच्या तुलनेत सुधारली आहे. व्हॉल्व्हमधील गळत्या बंद करण्याचे काम सुरू झाले. दुभाजकातील झाडांना आकार देणे, माती उचलणे, दुभाजक तुटलेले असतील, तर दुरुस्ती, पॅचवर्क आदी कामे मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहेत.
वसुली अचानक वाढली
आयुक्त रुजू होण्यापूर्वी मालमत्ता कराची वसुली नऊ झोनमध्ये दिवसभरात १० ते १५ लाख रुपये होती. आता हे प्रमाण ६० लाखांहून अधिक झाले आहे. दोन आठवड्यांत मालमत्ता करापोटी तिजोरीत ८ कोटींहून अधिक रक्कम आली आहे. ३१ मार्चपर्यंत शंभर टक्के वसुली हवी, असा इशारा आयुक्तांनी दिला आहे.
अतिक्रमण हटाव विभाग कामाला लागला
वर्षभरात सोयीनुसार आठ ते दहा ठिकाणीच अतिक्रमण हटाव विभाग कारवाई करीत होता. आयुक्त पाण्डेय आल्यानंतर अतिक्रमण हटाव विभाग एक दिवसही थांबला नाही. सतत कुठे ना कुठे कारवाई सुरूच आहे. सर्वसामान्य नागरिकांनी दिलेल्या तक्रारींकडे हा विभाग दुर्लक्ष करीत असे.
आयुक्तांचे काम बरे सुरू आहे
नवनियुक्त आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांचे काम दररोज वर्तमानपत्रात वाचायला मिळते. काम पाहून बरे चालले आहे, असे दिसून येते. चांगले प्रयत्न केल्यास यश हमखास मिळते.
- कृष्णा भोगे, माजी सनदी अधिकारी.