औरंगाबाद शहरातील नालेसफाई पाऊसच करणार; मनपाकडून मान्सूनपूर्व कामाला अद्याप सुरुवातच नाही 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2018 11:26 AM2018-06-02T11:26:11+5:302018-06-02T11:27:45+5:30

रोहिण्या नक्षत्रातील पावसाने शुक्रवारी शहरात हजेरी लावली. मृग नक्षत्रापूर्वी शहर आणि परिसरात दमदार पाऊस होणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

Aurangabad municipalitys before Monsoon work has not started yet | औरंगाबाद शहरातील नालेसफाई पाऊसच करणार; मनपाकडून मान्सूनपूर्व कामाला अद्याप सुरुवातच नाही 

औरंगाबाद शहरातील नालेसफाई पाऊसच करणार; मनपाकडून मान्सूनपूर्व कामाला अद्याप सुरुवातच नाही 

googlenewsNext
ठळक मुद्देमहापालिका प्रशासन नालेसफाईवर तब्बल पावणेदोन कोटी रुपये खर्च करणार आहे.

औरंगाबाद : रोहिण्या नक्षत्रातील पावसाने शुक्रवारी शहरात हजेरी लावली. मृग नक्षत्रापूर्वी शहर आणि परिसरात दमदार पाऊस होणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. महापालिकेने अद्याप मान्सूनपूर्व कोणतेही काम सुरू केलेले नाही, हे विशेष. यंदा शहरातील नाल्यांची सफाई पाऊसच करणार हे जवळपास निश्चित झाले आहे. असे असताना महापालिका प्रशासन नालेसफाईवर तब्बल पावणेदोन कोटी रुपये खर्च करणार आहे. शनिवारी घाई गडबडीत कंत्राटदारांना वर्कआॅर्डरही देण्यात आली. रविवारपासून नाले‘सफाई’ची घोषणा महापौरांनी केली.

दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नालेसफाई, खड्डे बुजविणे तसेच विद्युत पथदिव्यांमध्ये विजेचा प्रवाह संचारणार नाही आदी कामे मनपाला करावी लागतात. वर्षानुवर्षे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनाही ही बाब माहीत आहे. ऐनवेळी मर्जीतील कंत्राटदाराला ही कामे देण्याची सवयही अधिकाऱ्यांनीच लावली आहे. जून महिना उजाडला तरी मनपाने नालेसफाईची निविदा अंतिम केली नाही. त्यामुळे गुरुवारी मनपा आयुक्त डॉ.निपुण विनायक यांनी शहर अभियंता एस. डी. पानझडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली.

गुरुवारी स्वत: आयुक्तांनी शहरातील नाल्यांची विदारक अवस्थाही बघितली. यंदा नाले शंभर टक्के स्वच्छ न झाल्यास औरंगाबादकरांना बुडविणार हे निश्चित. शुक्रवारी महापालिकेने घाई गडबडीत नालेसफाईचे काम साधना इंजिनिअरिंगला देण्यात आले. रविवारपासून नालेसफाईची कामे गतीने सुरू होतील, असे महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितले. नाल्यांची सफाई भाडेतत्त्वावरील यंत्रणा लावून करण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. त्याची निविदा शुक्रवारी अंतिम करण्यात आली असून, साधना इंजिनिअरिंग कंपनीने सर्वात कमी ११ टक्के  दराने निविदा भरल्याने त्या एजन्सीला काम देण्यात आले आहे. भाडेतत्त्वावरील यंत्रणा नालेसफाईच्या कामासाठी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे रविवारी सकाळपासूनच नाल्यांची सफाई सुरू होईल. या कामाची पदाधिकारी व आयुक्त संयुक्तपणे पाहणी करणार असल्याचे महापौरांनी सांगितले.

दरवर्षी एकालाच काम
नालेसफाईचे काम दरवर्षी साधना इंजिनिअरिंगच्या कंत्राटदाराला देण्यात येते. दरवर्षी महापालिका याच कंत्राटदारावर का मेहरबानी दाखविते हा सर्वात मोठा प्रश्न आहे. मनपा आयुक्तांनी मागील रेकॉर्ड तपासून बघितले तर कागदावरच लक्षात येईल, नालेसफाई कशा पद्धतीने झाली आहे. 

Web Title: Aurangabad municipalitys before Monsoon work has not started yet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.