कचरा संकलक कंपनीसमोर मनपाचे रेड कार्पेट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2019 06:48 PM2019-06-28T18:48:46+5:302019-06-28T18:51:12+5:30

पी. गोपीनाथ रेड्डी या कंपनीसमोर मनपा प्रशासनाने रेड कार्पेट अंथरून ठेवले आहे.

Aurangabad municipality's red carpet for garbage collector company | कचरा संकलक कंपनीसमोर मनपाचे रेड कार्पेट !

कचरा संकलक कंपनीसमोर मनपाचे रेड कार्पेट !

googlenewsNext
ठळक मुद्देपार्किंगसाठी पाच जागा मोफतमालकीच्या ७० रिक्षाही दिल्या

औरंगाबाद : शहरातील कचरा संकलन करणाऱ्या पी. गोपीनाथ रेड्डी या कंपनीसमोर मनपा प्रशासनाने रेड कार्पेट अंथरून ठेवले आहे. कंपनीची वाहने उभी करण्यासाठी शहरात पाच ठिकाणी मोफत स्वरूपात महापालिकेने भूखंड उपलब्ध करून दिल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. 
महापालिकेच्या मालकीच्या ७० रिक्षाही कंपनीला वापरण्यासाठी देण्यात आल्या आहेत. विशेष बाब म्हणजे या रिक्षांची देखभाल दुरुस्ती अनेक महिन्यांपासून महापालिका करीत आहे. एका खाजगी कंपनीचे एवढे लाड पुरविल्यानंतरही कंपनी एक मेट्रिक टन कचरा उचलल्यानंतर मनपाकडून १६८० रुपये वसूल करीत आहे.

कंपनीने पहिल्या दिवसापासून व्यावसायिक धोरण स्वीकारले आहे. कंपनीचे १ कोटी ३९ लाख रुपयांचे बिल लेखा विभागात प्रलंबित आहे. कंपनीच्या कामगारांनी मंगळवारी कामबंद आंदोलन करून मनपाला, शहराला वेठीस धरले. कंपनीला तातडीने ५० लाख रुपये द्या, अशी शिष्टाई महापौर नंदकुमार घोडेले यांनी केली. कंपनी काम सोडून पळून जाईल, या भीतीपोटी कंपनीच्या सर्व मागण्या विनाअट मंजूर करण्यात येत आहेत. मनपाने कंपनीसोबत केलेल्या करारात पार्किंगसाठी मोफत भूखंड उपलब्ध करून देण्याचा कुठेच उल्लेख नाही. तरीही कंपनीला एन-१२, शिवाजीनगर पाण्याची टाकी, उल्कानगरी, रमानगर, मध्यवर्ती जकात नाका येथे पार्किंगसाठी भूखंड देण्यात आले आहेत. या भूखंडापोटी मनपा कंपनीकडून एक रुपयाही भाडे घेत नाही, हे विशेष.

शहरातील ११५ वॉर्डांतील कचरा संकलन करण्यासाठी कंपनीने स्वत:च्या नावावर असलेली वाहने खरेदी करावीत, अशी अट आहे. महापालिकेने तब्बल ७० रिक्षा कंपनीला कचरा उचलण्यासाठी दिल्या आहेत. या सर्व रिक्षांचे मेंटेनन्स आजही मनपा प्रशासन करीत आहे. कंपनी आपल्या इतर रिक्षांसोबत मनपाच्या रिक्षांचीही देखभाल दुरुस्ती करू शकते, पण मनपा प्रशासन लाखो रुपये खर्च करीत आहे.

संमिश्र कचऱ्यावर प्रक्रिया करणार तरी कशी?
- कंपनीने शहरातील ११५ वॉर्डांतील नागरिकांच्या दारावर जाऊन कचरा जमा करावा, असे करारात नमूद केले आहे. मोजक्याच वॉर्डांमध्ये डोअर-टू- डोअर कलेक्शन सुरू आहे. अनेक वॉर्डांमध्ये कंपनी गल्लोगल्लीत पडलेला कचरा उचलण्याचे काम करीत आहे. 
- एकाही नागरिकाच्या दारावर कंपनी जाण्यास तयार नाही. कंपनीने ओला व सुका कचरा वेगळा जमा केला पाहिजे, असेही करारात म्हटले असताना मोठ्या वाहनांमध्ये सर्व कचरा मिक्स करून प्रक्रिया केंद्रावर नेण्यात येत आहे. 
- मिक्स कचऱ्यावर प्रक्रिया करणार तरी कशी, असा प्रश्न प्रक्रिया करणाऱ्या कंत्राटदारांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

सहा झोनमध्ये काम
कंपनीला आपले काम सुरू करून पाच महिने होत आले तरी शहरातील सहा झोनमधीलच कचरा कंपनी जमा करीत आहे. उर्वरित तीन झोनमध्ये आजही महापालिका लाखो रुपये खर्च करून कचरा संकलन, वाहतूक करीत आहे. कंपनीने काम सुरू केल्यावर मनपाची कोट्यवधी रुपयांची बचत होईल, असे दिवास्वप्न प्रशासनाने दाखविले होते. या खर्चात किंचितही फरक पडलेला नाही.

Web Title: Aurangabad municipality's red carpet for garbage collector company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.