Aurangabad Nagar Panchayat Election Result: केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंना धक्का, अब्दुल सत्तारांनी फडकवला भगवा; काँग्रेसला मिळाला भोपळा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2022 01:47 PM2022-01-19T13:47:29+5:302022-01-19T13:48:22+5:30
केंद्रीय मंत्री भागवत कराड, रावसाहेब दानवे हे दोघंही याठिकाणाहून येतात. परंतु भाजपाला जनतेने भुईसपाट केले आहे असा आरोप अब्दुल सत्तार यांनी केला आहे.
औरंगाबाद – राज्यभरात नगरपंचायतीचे निकाल हळूहळू समोर येत आहेत. या निवडणुकीच्या निकालात महाविकास आघाडीनं भाजपाला जोरदार धक्का दिल्याचं पाहायला मिळत आहे. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंच्या सोयगाव नगरपंचायतीत भाजपाला फटका बसला आहे. भाजपाच्या ताब्यात असलेली ही नगरपंचायत शिवसेनेने खेचून आणली आहे. मंत्री अब्दुल सत्तारांच्या नेतृत्वात शिवसेनेने याठिकाणी भगवा फडकवला आहे.
या निवडणुकीच्या निकालावर अब्दुल सत्तार म्हणाले की, माझ्याविरोधात सर्वच पक्ष एकत्रित येतात. परंतु पहिल्यांदाच माझ्या मतदारसंघात शिवसेनेची एकहाती सत्ता आली आहे. केंद्रीय मंत्री भागवत कराड, रावसाहेब दानवे हे दोघंही याठिकाणाहून येतात. परंतु भाजपाला जनतेने भुईसपाट केले आहे. औरंगाबाद जिल्ह्यात आगामी निवडणुकीत शिवसेनेची एकहाती सत्ता राहील हे स्टॅम्प पेपरवर लिहून देतो. जिल्हा परिषद निवडणुकीत या निकालाचे पडसाद पहायला मिळतील असं सत्तार म्हणाले.
भाजपा, काँग्रेस प्रत्येकाने अब्दुल सत्तार यांचं नेतृत्व संपवण्याचा प्रयत्न केला. अब्दुल सत्तार यांनी शिवसेनेत प्रवेश केला ते काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांना रुचला नाही. भाजपाला तडीपार करण्यासाठी महाविकास आघाडी आहे. परंतु याठिकाणी काँग्रेसनंही माझा विरोध केला. औरंगाबाद जिल्ह्यात शिवसेनेला एकहाती सत्ता आणून देऊ. शिवसेना एकमेव सत्ताधारी पक्ष राहील अशी गॅरंटी आहे. उद्धव ठाकरेंनी जो विश्वास ठेवला तो सार्थ ठरवला आहे असं अब्दुल सत्तार म्हणाले. ओबीसीच्या नावाखाली भाजपाने दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला म्हणून काही ठिकाणी यशस्वी झाले. ओबीसी आरक्षणावर सुप्रीम कोर्टाने रोक लावला. परंतु भाजपाने महाविकास आघाडीवर आरोप करत लोकांमध्ये गैरसमज पसरवला असा आरोपही अब्दुल सत्तार यांनी केला. सोयगाव नगर पंचायतीच्या निकालात शिवसेनेला १७ पैकी ११ जागा मिळाल्या आहेत तर भाजपाला ६ जागांवर समाधान मानावं लागलं आहे. तर काँग्रेसला यंदाच्या निवडणुकीत भोपळा मिळाला आहे.
सोयगाव नगरपंचायतीचे निकाल
वॉर्ड क्र. 1 शिवसेना - शाहिस्ताबी राउफ विजयी
वॉर्ड क्र. 2 - शिवसेना- अक्षय काळे विजयी
वॉर्ड क्र. 3 - शिवसेना- दीपक पगारे विजयी
वॉर्ड क्र.4 - शिवसेना- हर्षल काळे विजयी
वॉर्ड क्र.5 - भाजप - वर्षा घनगाव विजयी
वॉर्ड क्र.6 - शिवसेना - संध्या मापारी विजयी
वॉर्ड क्र.7 - भाजप - सविता चौधरी विजयी
वॉर्ड क्र.8 - शिवसेना - कुसुमबाई राजू दुतोंडे विजयी
वॉर्ड क्र.9 - शिवसेना- सुरेखाताई काळे विजयी
वॉर्ड क्र.10 - शिवसेना - संतोष बोडखे विजयी
वॉर्ड क्र.11 - भाजप - संदीप सुरडकर विजयी
वॉर्ड क्र.12 - शिवसेना - भगवान जोहरे विजयी
वॉर्ड क्र.13 - भाजप- ममताबाई इंगळे विजयी
वॉर्ड क्र.14 - भाजप आशियाना शाह विजयी
वॉर्ड क्र.15 - भाजप सुलतानाबी देशमुख विजयी
वॉर्ड क्र.16 - शिवसेना - गजानन कुडके विजयी
वॉर्ड क्र.17 - शिवसेना आशाबी तडवी विजयी