औरंगाबादमध्ये थर्माकोल, कचऱ्याने बुजतेय मोठ्या नाल्याचे पात्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 06:13 PM2018-12-20T18:13:54+5:302018-12-20T18:22:34+5:30
महानगरपालिकेच्या ढिसाळ कारभाराचा बळी शहरातील हा मुख्य नाला ठरतो आहे.
औरंगाबाद : सिटीचौक ते किलेअर्क रोहिलागल्लीदरम्यानच्या मोठ्या नाल्याचे अस्तित्व धोक्यात आले आहे. येथील पुलाच्या एका बाजूने थर्माकोलच्या कचऱ्याने पूर्ण नाला भरून गेला आहे, तर दुसऱ्या बाजूने शहरातील कचरा मोठ्या प्रमाणात आणून टाकल्याने अर्धा नाला बुजला आहे, अशीच परिस्थिती राहिली तर पावसाळ्यात आसपासच्या वसाहतीत नाल्याचे पाणी शिरण्याचा धोका आहे.
महानगरपालिकेच्या ढिसाळ कारभाराचा बळी शहरातील हा मुख्य नाला ठरतो आहे. या नाल्यावरील पुलावरून रात्रंदिवस वाहतूक सुरू असते. शहराच्या उत्तर बाजूचा सर्वात मोठा नाला म्हणून या नाल्याची ओळख आहे. सर्व मलमूत्र वाहून नेणाऱ्या या नाल्याचे अस्तित्व कचऱ्यामुळे धोक्यात आले आहे. पुलाच्या पूर्व बाजूस हजारो टन थर्माकोल साठले आहे. यामुळे पुलाखालून पाणी जाण्यास अडसर होऊन तेथे तुंबले आहे. पश्चिमेकडील बाजूस महानगरपालिकेने शहरातील सर्व कचरा आणून टाकणे सुरू केले आहे.
मागील वर्षभरात येथे एवढा कचरा साठला आहे की, आता नाल्याचे अर्धे पात्र कचऱ्याने व्यापले आहे. गेल्या मोसमात शहरात चार महिन्यांत २२ दिवसच पाऊस पडला. यामुळे नाला भरून वाहिला नाही, नसता पावसाळ्यातच आसपासच्या परिसरात नाल्यातील पुराचे पाणी शिरले असते. हा नाला बुजला तर शहरातील उत्तर भागातील सांडपाणी वाहून जाण्यासाठी दुसरा नाला नाही.
यामुळे सर्व नाल्यातील दुर्गंधीयुक्त पाणी आसपासच्या रहिवाशांच्या घरात घुसू शकते. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. हा भविष्यातील मोठा धोका आहे; परंतु महापालिकाच शहरातील कचरा नाल्यात आणून टाकत आहे. दररोज तो कचरा जाळला जात आहे. यामुळे आसपास राहणाऱ्या लोकांचे आरोग्य बिघडू लागल्याची माहिती येथील रहिवासी शेख खलील यांनी दिली. थर्माकोल व कचरा दोन्ही लवकर उचलून नाला मोकळा करावा, अशी मागणी अख्तरभाई, सलीम खान, युसूफ बागवान आदींनी केली आहे.