राज्यातील ११ गोवरग्रस्त शहरांत औरंगाबादचे नाव, पालकांकडून लसीसाठी विचारणा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2022 08:00 PM2022-11-30T20:00:45+5:302022-11-30T20:01:44+5:30
आतापर्यंत ७ गोवर पाॅझिटिव्ह, ९६ संशयित
औरंगाबाद : मुंबई, मालेगावसह राज्यातील ११ गोवरग्रस्त शहर आणि जिल्ह्यात अखेर मंगळवारी औरंगाबादच्या नावाचा समावेश झाला असून, शहरातील नेहरूनगरची प्रमुख बाधित विभाग म्हणून नोंद झाली आहे. औरंगाबादेत आतापर्यंत ९६ गोवर संशयित रुग्ण आढळले असून, ७ रुग्ण पाॅझिटिव्ह आढळले आहेत.
एका विशिष्ट भागात चार आठवड्यांच्या कालावधीत ५ किंवा त्यापेक्षा अधिक गोवर संशयित रुग्ण आढळल्यास आणि त्यापैकी किमान दोन रुग्ण गोवरबाधित आढळल्यास त्यास गोवर उद्रेक असे म्हटले जाते. राज्यात आतापर्यंत ७४ उद्रेक झालेले असून, औरंगाबादेतील एक उद्रेकग्रस्त विभाग म्हणून नेहरूनगरचा समावेश झाला आहे.
पालकांकडून लसीसाठी विचारणा
९ महिने ते १२ महिन्यांदरम्यान बालकांना गोवर आणि रुबेला लसीचा पहिला डोस दिला जातो. तर १६ महिने ते २४ महिन्यांदरम्यान दुसरा डोस दिला जातो, परंतु अनेक बालके या दोन्ही डोसपासून दूर राहिली आहेत. शहरात गोवरचे संशयित आणि पाॅझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यानंतर पालकांकडून आता लसीसाठी विचारणा केली जात आहे. त्यासाठी आरोग्य केंद्रापासून, तर खासगी रुग्णालयही गाठले जात आहे.
६ महिन्यांच्या बालकांना लस द्यावी
बालकांना ९व्या महिन्यांत गोवरची लस दिली जाते, परंतु सध्या परिस्थिती पाहता ६ महिन्यांच्या बालकांना गोवरची लस देण्याचा विचार करण्याची गरज आहे. गोवरच्या परिस्थितीचे सर्वेक्षणही केले पाहिजे.
- डाॅ. प्रशांत पाटील, बालरोगतज्ज्ञ