भलत्याच पत्त्यावर सुरू केले ड्रायव्हिंग स्कूल, आरटीओने ठोकले सील
By संतोष हिरेमठ | Published: September 22, 2022 08:13 PM2022-09-22T20:13:23+5:302022-09-22T20:15:11+5:30
परवानगी दिलेल्या पत्त्याऐवजी दुसऱ्याच पत्त्यावर मोटार ड्रायव्हिंग स्कूल चालविण्याचा उद्योग शहरात सर्रास सुरु आहे.
औरंगाबाद : परवानगी दिलेल्या पत्त्याऐवजी दुसऱ्याच पत्त्यावर मोटार ड्रायव्हिंग स्कूल चालविण्याचा उद्योग शहरात सर्रास सुरु आहे. अशाच ३ मोटार ड्रायव्हिंग स्कूलला सील ठोकून आरटीओ कार्यालयाने कारवाईचा बडगा उगारला.
आरटीओ कार्यालयाने ज्या नोंदणीकृत पत्त्यावर परवानगी दिलेली आहे, त्याच ठिकाणी ड्रायव्हिंग स्कूल असणे आवश्यक आहे. मात्र काही स्कूल अन्यत्र असल्याची माहिती आरटीओ कार्यालयास प्राप्त झाली. त्यानुसार प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय मेत्रेवार, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी मनिष दौंड यांनी ड्रायव्हिंग स्कूलची तपासणी केली. तेव्हा ३ ड्रायव्हिंग स्कूल नोंदणीकृत पत्त्यावर नसल्याचे आढळून आले.
या तिन्ही ड्रायव्हिंगला शेंद्रा एमआयडीसी, कुंभेफळ येथे परवानगी देण्यात आलेली होती. प्रत्यक्षात तिघांनी शहरातील पुंडलिकनगर, मुकुंदवाडी, रामनगर-विठ्ठलनगर येथे ड्रायव्हिंग स्कूल सुरू केल्याचे आढळून आले. आरटीओ कार्यालयाची परवानगी न घेता इतरत्र कार्यरत असणाऱ्या या तिन्ही ड्रायव्हिंग स्कूलला सील ठोकण्यात आले आहे.