पैठणमध्ये 'स्पेशल 26' सारखी घटना; माजी नगराध्यक्षाच्या दुकानावर तोतया सीबीआयची रेड
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2022 06:13 PM2022-07-03T18:13:21+5:302022-07-03T19:50:36+5:30
Aurangabad News: पैठणचे माजी नगराध्यक्ष तथा भाजपच्या युवा मोर्च्याचे जिल्हाध्यक्ष सुरज लोळगे यांच्या दुकानावर तोतया सीबीआय अधिकाऱ्याची रेड.
पैठण: तुम्ही अक्षय कुमारचा 'स्पेशल 26' हा चित्रपट पाहिला असेल. त्यात अक्षय कुमार आणि त्याची टीम कधी तोतया सीबीआय अधिकारी तर कधी इनकम टॅक्स अधिकारी बनून धाडी मारत असतात. तसाच प्रकार पैठणमध्ये घडला आहे. पैठणच्या माजी नगराध्यक्षाच्या दुकानावर अशाच प्रकारची तोतया धाड पडली. विशेष म्हणजे या प्रकरणाचा मास्टर माईंड पैठण येथील भाजपाचाच ओबीसी मोर्चाचा पदाधिकारी असल्याचे समोर आले असून रघुनाथ ईच्छैय्या असे त्याचे नाव आहे. या तोतया धाडीने पैठण शहरातील सराफा पेढीत मोठी खळबळ उडाली, दुपारनंतर दुकाने बंद करून व्यापारी पोलीस ठाण्यात जमा झाले.
नेमकं काय घडलं?
औरंगाबाद जिल्ह्यातील पैठणचे माजी नगराध्यक्ष तथा भाजपच्या युवा मोर्च्याचे जिल्हाध्यक्ष सुरज लोळगे यांच्या दुकानावर एका सीबीआय अधिकाऱ्याने रेड केल्याची माहिती समोर आली. यावेळी त्या तोतया अधिकाऱ्याने लोळगे यांच्या दुकानात पैशांची मागणी केली. मात्र त्याच्या हालचालींवर संशय आल्याने सुरज लोळगे यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्याची चौकशी केली आणि त्याला ताब्यात घेतले.
50 लाखांची मागणी
सुरज लोळगे आपल्या सोन्याच्या दुकानात बसले होते. यावेळी विट्ठल हरगुडे नावाचा व्यक्ती दुकानात आला. त्याच्या हातात एक फाईल होती. त्याने लोळगे यांना सीबीआय ऑफिसर असल्याचे सांगितले. पण त्याच्या बोलण्यावर सुरज यांना संशय आला. तोतया अधिकाऱ्याने सुरज लोळगे यांच्याकडे चौकशी रफादफा करायची असेल तर 50 लाखांची मागणी केली. यानंतर सुरज लोळगे यांनी दुकानातून उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल नेहूल यांना फोन करून माहिती दिली. तातडीने उपविभागीय अधिकारी नेहूल, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद मुंढे यांनी दुकानात जाऊन सीबीआय अधिकाऱ्याची चौकशी केली. यावेळी आरोपी कमालीचा गोंधळला आणि उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
भाजप पदाधिकारी मास्टरमाईंड
तोतया सीबीआय अधिकारी बनून आलेल्या अधिकाऱ्याचे नाव विठ्ठल नामदेव हारगुडे(50 रा. पुणे) आहे. दरम्यान पोलिसांनी हारगुडेस ताब्यात घेतल्याचे समजताच कारमध्ये बसलेला त्याचा साथीदार डॉ. घाटे(रा. पुणे) हा कार घेऊन फरार झाला. पोलीसांनी हारगुडे याच्याकडे केलेल्या चौकशीत या प्रकरणाचा मास्टरमाइंड पैठण येथील भाजपाचा ओबीसी मोर्चाचा पदाधिकारी रघुनाथ ईच्छैय्या असल्याचे समोर आल्याने पोलिसांनी रघुनाथ ईच्छैय्या, त्याचा चालक व एक साथिदार अशा तिघांना ताब्यात घेतले आहे. पोलीस चौकशीत या प्रकरणात आणखी गुन्हेगारांचा समावेश आहे का हे समोर येणार आहे.