Aurangabad: औरंगाबादेत भाजप-शिवसेना युतीने मारली बाजी, 14 पैकी 14 जागांवर विजय
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2022 16:39 IST2022-01-23T16:38:29+5:302022-01-23T16:39:08+5:30
Aurangabad : जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या निवडणूकीत हरिभाऊ बागडे आणि अब्दुल सत्तार यांच्या गटाने 14 पैकी 14 जागा जिंकत युतीचा झेंडा फडकावला.

Aurangabad: औरंगाबादेत भाजप-शिवसेना युतीने मारली बाजी, 14 पैकी 14 जागांवर विजय
औरंगाबादःराज्यात भाजप आणि शिवसेना एकमेकांचे विरोधक असले तरी, औरंगाबाद जिल्ह्यात भाजप-शिवसेना(Shivsen-Bjp) युतीने मोठा विजय मिळवला आहे. अख्या जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या निवडणूकीत शिवसेना-भाजप युतीने विजय मिळवत युतीचा झेंडा फडकावला आहे.
14 जागांवर युतीचा विजय
शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी भाजपला सोबत घेऊन दूध संघावर युतीची सत्ता आणली आहे. औरंगाबाद तालुका मतदार संघातून संघाचे अध्यक्ष आमदार हरिभाऊ बागडे यांच्या विरुद्ध काँग्रेसच्या सुरेश पठाडे यांचा अर्ज कायम राहिल्यामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली होती. अखेर अब्दुल सत्तार आणि हरिभाऊ बागडे गटाने 14 पैकी 14 जागा जिंकल्या. दूध संघाच्या निवडणुकीत शंभर टक्के मतदान झाले होते.
शंभर टक्के मतदान
120 कोटी रुपयांहून अधिकची वार्षिक उलाढाल असलेल्या औरंगाबाद जिल्हा दूध उत्पादक संघाची निवडणूक गेल्या वेळेप्रमाणे यावेळेसही बिनविरोध करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. सहा मतदान केंद्रावर शांततेत शंभर टक्के मतदान झाले होते. औरंगाबाद जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने सहकार क्षेत्रात जोरदार हालचालींना वेग आला होता. साऱ्या जिल्ह्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागून राहिले होते.