त्याने श्वास घेतला आणि सर्वांनीच नि:श्वास सोडला, डॉक्टरांच्या प्रयत्नाने वाचले प्राण
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2022 04:26 PM2022-02-01T16:26:17+5:302022-02-01T16:26:25+5:30
संतोष हिरेमठ औरंगाबाद : बेशुद्ध अवस्थेतील रुग्णाची छाती हाताने दाबून (सीपीआर), छातीवर शाॅक (डी. सी.) देऊन रुग्णाचा जीव वाचविल्याचा ...
संतोष हिरेमठ
औरंगाबाद : बेशुद्ध अवस्थेतील रुग्णाची छाती हाताने दाबून (सीपीआर), छातीवर शाॅक (डी. सी.) देऊन रुग्णाचा जीव वाचविल्याचा प्रसंग तुम्ही चित्रपटात अनेकदा पाहिला असेल. असाच काहीसा प्रसंग जिल्हा रुग्णालयात घडला. छाती दुखते म्हणून रुग्णालयात आलेला तरुण हृदयविकाराच्या झटक्याने अचानक कोसळला. त्याची नाडीही लागत नव्हती, पण अवघ्या २० मिनिटांत डाॅक्टर आणि परिचारिकांनी सीपीआर, तीन वेळा शाॅक ट्रिटमेंट देत शर्थीचे प्रयत्न केले आणि रुग्णाचा जीव वाचला.
जिल्हा सामान्य रुग्णालयात २९ वर्षीय तरुण छातीत दुखते म्हणून बाह्यरुग्ण विभागात आला होता. रुग्णालयात येताच तो अचानक खाली कोसळला. हा प्रकार लक्षात येताच डाॅक्टर, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांच्या मदतीने त्यास अपघात विभागात दाखल केले. या रुग्णाची नाडी लागत नव्हती, रक्तदाब लागत नव्हता. अशा परिस्थितीत क्षणाचाही विलंब न करता ‘सीपीआर’ देण्यास सुरुवात करण्यात आली. आवश्यक इंजेक्शनसह त्याला रक्तदाबाचे इंजेक्शन देण्यात आले. रुग्णाला तीन वेळा शाॅक देण्यात आला. तिसऱ्या शाॅकनंतर रुग्णाचा श्वासोच्छवास सुरू झाला आणि सर्वांनी नि:श्वास सोडला. या रुग्णाला व्हेंटिलेटरवर घेण्यात आले. प्रकृती सामान्य झाल्यानंतर त्यास अँजिओप्लास्टीसाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे अँजिओप्लास्टी झाली असून, रुग्णाची प्रकृती चांगली असल्याचे जिल्हा रुग्णालयातील डाॅक्टरांनी सांगितले.
मित्राने ओळखले गांभीर्य...
सदर तरुण हा मित्रासोबत रुग्णालयात आला होता. त्याला काही दिवसांपासून छातीत दुखण्याचा त्रास सुरु होता. काही होत नाही म्हणून दुखणे अंगावर काढत होता; मात्र मित्राच्या सल्ल्यामुळे तो रुग्णालयात आला व रुग्णालयात कोसळला. हा प्रकार रुग्णालयाबाहेर कुठे झाला असता तर जीव धोक्यात जाण्याची भीती होती, असे डाॅक्टरांनी सांगितले. जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. दयानंद मोतीपवळे यांच्या मार्गदर्शनाखाली फिजिशियन डाॅ. सुनील गायकवाड, डाॅ. कीर्ती तांदळे, डाॅ. हेमंत मरमठ, डाॅ. संजय वाकूडकर यांच्यासह परिचारिका आणि कर्मचाऱ्यांनी रुग्णासाठी प्रयत्न केले. रुग्णालयात असा प्रसंग प्रथमच अनुभवास आला.