Aurangabad News: मारुतीचे इंजिन अन् स्प्लेंडरची चेन; औरंगाबादच्या रँचोने घरातच बनवले हेलिकॉप्टर, पहा Video...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2022 01:35 PM2022-09-21T13:35:19+5:302022-09-21T13:37:11+5:30
Video: लॉकडाउन काळात युट्यूबवरील व्हिडिओ पाहून हॅलिकॉप्टर बनवले. उडवायला गच्चीवर गेला, पण...
औरंगाबाद: सोशल मीडियावर अनेकदा 'देसी जुगाड'चे व्हिडिओ व्हायरल होत असतात. देसी जुगाड म्हणजे, टाकाऊ किंवा भंगार वस्तुंपासून एखादी चांगली-उपयोगी वस्तू बनवने. अशीच एक आगळी-वेगळी वस्तू औरंगाबादच्या रॅचोने तयार केली आहे. ITIचे शिक्षण घेतलेल्या तरुणाने घरीच चक्क हेलिकॉप्टर तयार केले आहे. विशेष म्हणजे, यासाठी त्याने मारुती कारचे इंजिन आणि गिअर बॉक्स, स्कूटीचा पेट्रोल टँक आणि हेलिकॉप्टरच्या टेल रोटरसाठी स्प्लेंडरची चैन वापरली आहे. पण, दुर्दैवाने त्याची टेस्ट राईड फसली...
लॉकडाउनमुळे नोकरी गेली, पण कल्पन सुचली
घरातच चक्क हेलिकॉप्टर तयार करणाऱ्या रँचोचे नाव सतीश मुंडे आहे. घरची आर्थिक परिस्थिती ठीक नसल्यामुळे, वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी तो घर चालवण्यासाठी कंपनीत कामाला लागला. पण, दुर्दैवाने लॉकडाउनमध्ये त्याची नोकरी गेली. लॉकडउन काळात काय करावे, हा प्रश्न सतत त्याच्या मनात यायचा. या काळात युट्यूबवर व्हिडिओ पाहून त्याने चक्क हेलिकॉप्टर बनवण्याचे ठरवले. यासाठी त्याने आपली तीन वर्षांची जमापुंजी पणाला लावली.
भंगारातून साकारले हेलिकॉप्टर
युट्यूबवर व्हिडिओ पाहून त्याने भंगार वस्तूंपासून हेलिकॉप्टर तयार केले. यात त्याने मारुती कारचे इंजिन आणि गिअर बॉक्स, स्कूटीचे पेट्रोल टँक आणि हेलिकॉप्टरच्या टेल रोटरसाठी स्प्लेंडरची चैन बसवली. असा सगळा 'देसी जुगाड' करत त्याने हेलिकॉप्टर तयार केले. यानंतर त्याने या हेलिकॉप्टरची टेस्ट राईड घेण्याचा प्रयत्न केला, पण आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर नसल्यामुळे हेलिकॉप्टर उडाले नाही. पण, औरंगाबादच्या ITI महारोजगार मेळाव्यात हेच हेलिकॉप्टर सर्वांच्या कुतूहलाचा विषय ठरले.
हवेत उडणाऱ्या गोष्टींची आवड
औरंगाबाद येथील राँचो सतीश मुंडेला हवेत उडणाऱ्या गोष्टींची लहानपणापासूनच आवड आहे. बारावीचे शिक्षण झाल्यावर सतीशने हेलिकॉप्टर तयार करायचे ठरवले होते. अखेर त्याने लॉकडाउन काळात स्क्रॅपमधील वस्तूंपासून रांजणगाव येथे हेलिकॉप्टर तयारही आहे. यासाठी त्याला 2 ते अडीच लाख रुपयांचा खर्च आला आहे. पण, आता पैसे संपल्यामुळे हेलिकॉप्टरच्या कव्हरिंगचे काम अर्धवट राहिले आहे. सतीश मूळ बीड जिल्ह्यातील परळीचा रहिवासी असून, तो सध्या औरंगाबादच्या रांजणगाव शेणपुंजी येथे कुटुंबीयांसमवेत राहतो. सतीशला हेलिकॉप्टरच्या उर्वरित कामासाठी अजून 1 ते दीड लाख रुपये लागणार असून, एखाद्या वर्षात याचे काम पूर्ण होईल, असा विश्वास त्याला आहे.